सततच्या पराभवामुळे विरोधक अस्वस्थ आहेत.

भारतीय जनता पक्षाचा प्रतिवार, आयोगाला पाठिंबा

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सततच्या पराभवांमुळे विरोधक बेभान बनले आहेत, असा घणाघात भारतीय जनता पक्षाने केला आहे. विरोधकांचे स्वत:वरचे नियंत्रण सुटले आहे. आपल्या अकार्यक्षमतेसाठी ते केंद्रीय निवडणूक आयोगावर आगपाखड करीत आहेत. आयोगाने सर्व आरोप फेटाळले असून भारतीय जनता पक्षाचा निवडणूक आयोगाच्या नि:पक्षपातीपणावर पूर्ण विश्वास आहे. विरोधकांनी जनतेचा विश्वास गमावला आहे, अशीही टीका विरोधी खासदारांच्या मोर्चानंतर पक्षाने केली आहे.

विरोधकांना लोकशाहीशी काहीही देणेघेणे नाही. त्यांना कोणत्याही मार्गाने केवळ सत्ता हवी आहे. त्यामुळे त्यांनी केंद्र सरकार आणि घटनात्मक संस्था यांच्यावर खोटेनाटे आरोप करुन स्वत: प्रसिद्धीच्या झोतात राहण्याची केविलवाणी धडपड चालविली आहे. भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्रपक्ष यांचे केंद्रातील सरकार, तसेच राज्यांमधील सरकारे, जनतेच्या आशीर्वादाने आणि जनादेशानुसार स्थापन झाली आहेत. तथापि, विरोधकांना भारतीय मतदाराविषयी कोणतीही आस्था नाही. त्यामुळे त्यांनी काल्पनिक मुद्द्यांवर भुई थोपटण्याचा प्रकार चालविला आहे. तथापि, जनता विरोधकांना ओळखून आहे. त्यामुळे विरोधकांचे सर्व आकांडतांडव वाया जाणार आहे, हे निश्चित, अशी टीका पक्षनेते चौहान यांनी केली आहे.

अवैध मतदारांना काँग्रेसचा पाठिंबा

एसआयआरला विरोध करुन काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष अवैध मतदारांना पाठिंबा देत आहेत. एसआयआर प्रक्रिया मृत, अनुपस्थित, अस्तित्वात नसलेले, स्थलांतर झालेले आणि ज्यांच्याजवळ डुप्लिकेट मतदार परिचयपत्रे आहेत, असे मतदार कायद्याप्रमाणेच अवैध असतात. काँग्रेस अशा मतदारांचे समर्थन करत आहे. त्यामुळे जनतेमध्ये आता काँग्रेस किंवा इतर विरोधी पक्षांसंबंधी विश्वासाची भावना राहिलेली नाही. देशात अराजक माजविण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. पण तो यशस्वी होणार नाही, असे सडेतोड टीका भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केली आहे. आतापर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेले सर्व निर्णय एकमुखानेच घेतलेले आहेत. तसेच, एसआयआर किंवा फॉर्म 6 सह देण्याचे डिक्लरेशन या संबंधीचे निर्णयही एकमुखानेच घेण्यात आले आहेत, असे स्पष्टीकरण आयोगाने यापूर्वीच केले आहे.

Comments are closed.