पंढरपुरात परिचारकांच्या सत्तेला सुरुंग; महाविकास आघाडीची सत्ता

गेल्या चाळीस वर्षांपासून पंढरपूर नगरपरिषदेवर वर्चस्व असलेल्या भाजपचे नेते प्रशांत परिचारक यांच्या सत्तेला डॉ. प्रणिता भालके यांनी सुरुंग लावला. भालके यांनी 11138 मताधिक्य घेत श्यामल शिरसाट यांचा पराभव केला. यंदा प्रथमच भाजपने कमळ चिन्हावर निवडणूक लढविली होती. मतदारांनी कमळ डावलून रिक्षाला पसंती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाणारा पंढरपूर कॉरिडॉर प्रस्तावित असल्याने भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. नगरपरिषद ताब्यात राहण्यासाठी भाजपने साम, दाम, दंडचा वापर केला. मात्र, मतदारांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवले.

महाविकास आघाडीच्या डॉ. भालके यांच्यासह 11 नगरसेवक निवडून आले. भाजपचे 20, परिचारक प्रणीत पंढरपूर मंगळवेढा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे 4 उमेदवार आणि 1 उमेदवार अपक्ष निवडून आला आहे.

मतमोजणीत पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. प्रणिता भगीरथ भालके यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी घेतली ती शेवटपर्यंत टिकवून ठेवत विजय मिळविला. भाजपचे परिचारक विरोधात तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे भगीरथ भालके यांच्यातच ही निवडणूक झाली. भाजपचे 20 नगरसेवक निवडून आले असले तरी नगराध्यक्ष निवडून आला नाही. त्यामुळे ‘गड आला, पण सिंह गेला’, अशी परिस्थिती भाजपची झाली आहे.

असेही आले निकाल

या निवडणुकीत तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून मनसेच्या उमेदवार माधुरी दिलीप धोत्रे या विजयी झाल्या आहेत. तर, आदित्य फत्तेपूरकर हे पराभूत झाले, तर त्यांच्या पत्नी स्मिता फत्तेपूरकर विजयी झाल्या. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्यामल शिरसाट पराभूत झाल्या आहेत. मात्र, त्यांच्या सूनबाई प्रतीक्षा शिरसाट विजयी झाल्या आहेत. तसेच अपक्ष म्हणून ओंकार अभय जोशी हे निवडून आले आहेत.

Comments are closed.