रेल्वे इंजिन जप्त करण्यात येणार आहे.

रेल्वे इंजिन जप्त होणार, यात आश्चर्यकारक असे काय आहे, असा प्रश्न आपल्याला पडणे साहजिक आहे. पण ते जप्त करण्याचा निर्णय घेतला जाण्यामागचे कारण भिन्न आहे. ते समजल्यावर आपल्यालाही, ते योग्यच आहे, असे निश्चितच वाटेल. ही घटना मध्यप्रदेशातील आहे. या राज्यात ‘रातापानी’ नामक एक व्याघ्र अभयारण्य आहे. या अभयारण्यातून रेल्वेमार्ग जातो. काही दिवसांपूर्वी या अभयारण्यातून एक रेल्वेगाडी भरधाव जात असताना एका वाघाला तिने टक्कर दिली. या अपघातात या वाघाचा मृत्यू झाला. त्यामुळे मध्यप्रदेशचा वनविभाग आणि भारताचा रेल्वे विभाग यांच्या मोठाच वाद निर्माण झालेला आहे.

बुधनी आणि मिडाघाट रेल्वे स्थानकांच्या मध्ये ही घटना घडली आहे. आपल्या सावजाचा पाठलाग करत वाघ धावत होता. तो रेल्वेमार्ग ओलांडत असताना त्याचवेळी या मार्गावरुन धावणाऱ्या रेल्वेने त्याला धडक दिली. वाघाचा तत्काळ मृत्यू झाला. त्याचे कलेवर छिन्नविछिन्न अवस्थेत रेल्वेमार्गाच्या बाजूलाच नंतर आढळून आले. त्याच्या कलेवराची तपासणी केली असता, रेल्वेगाडीच्या धडकेने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे वनविभागाने या घटनेसाठी रेल्वेला उत्तरदायी मानले आहे. रेल्वेने वेगाची मर्यादा ओलांडल्याने वाघ रेल्वेखाली आल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. तर केणीही रेल्वे मार्ग ओलांडत असल्यास आणि त्याला चालत्या रेल्वेचा धक्का बसल्यास रेल्वेविभाग उत्तरदायी नसतो, असे त्याचे म्हणणे आहे. वनविभागात रेल्वेचा वेग विशिष्ट मर्यादेपर्यंतच ठेवावा लागतो. या नियमाचे रेल्वे विभागाच्या चालकाकडून उल्लंघन झाले आहे, असे वनविभागाचे म्हणणे आहे. वनविभागाने आता ज्या रेल्वे इंजिनाची धडक वाघाला बसली, ते इंजिनच जप्त करण्यासाठी सज्जता चालविली आहे. मध्यप्रदेशात एका आठवड्यात रेल्वेमुळे वाघ मृत होण्याची ही दुसरी घटना आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये असे 10 वाघ, 15 बिबटे आणि 2 अस्वले रेल्वेच्या धडकेने मृत्यूमुखी पडली आहेत. आता वनविभागाने अशा प्रकारांच्या विरोधात कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला असून रेल्वे विभागाविरोधातही तक्रारी केल्या आहेत. वनविभागात वेगाचा नियम रेल्वेकडून पाळला जात नसल्याने हे अपघात होत आहेत, असे वनविभाचे म्हणणे आहे.

Comments are closed.