तलासरीवासीयांवर अस्मानी संकट; मदतीची फुटकी कवडीही नाही, 240 घरांचे नुकसान होऊन नऊ महिने उलटले
मे महिन्यात वादळी वाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका तलासरीवासीयांना बसला. या अवकाळी पावसामुळे तालुक्यातील 240 घरांचे नुकसान झाले. अस्मानी संकटात भरडल्या गेलेल्या नागरिकांना नऊ महिने उलटले तरी मदतीची फुटकी कवडीही मिळाली नाही. याबाबत अनेकदा आवाज उठवूनही त्याकडे कानाडोळा केला जात आहे. मात्र असे असताना सरकार राजकारणात बिझी असल्याने नैसर्गिक आपत्तीत बेघर झालेले नागरिक वाऱ्यावर आहेत.
तलासरी तालुक्यात मे 2024 ला 240 घरांचे नुकसान झाले. त्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून बेघर झालेल्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या आपत्तीनंतर प्रशासनाकडून पंचनामे तर करण्यात आले. मात्र नऊ महिने उलटले तरी नुकसानभरपाई मिळलेली नाही. मे 2024 रोजी कोचाई गावातील वडीपाडा, पाटीलपाडा, गुरोडपाडा, उबरपाडा, बडघापाडा, जुनेवारपाडा, उधवा येथील मिसाळपाडा, ठाकरपाडा, राबडपाडा, दळवीपाडा, वाणीपाडा, कासपाडा, गावठाणपाडा, सुरतीपाडा, केवडीपाडा, बाबनपाडा या गाव पाड्यांतील शेकडो घरांचे नुकसान झाले होते. वाड्यापाड्यातील गोठे, पोल्ट्री फार्मचे लाखोंचे नुकसान झाले. तसेच वीटभट्ट्यांचा चिखल झाला असून भाताच्या पेंढ्याही भिजल्या. यात दोन बैलांचा मृत्यू झाला.
लोकसभेपाठोपाठ आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या कामात प्रशासन व्यस्त असल्याचे कारण देत तहसीलदारांनी वेळ मारून नेली. लोकसभा, विधानसभेचा निकालही लागला, सरकार स्थापन झाले तरी नुकसानभरपाईचा पत्ताच नाही. आम्हाला भरपाई कधी मिळणार, असा सवाल नागरिकांनी विचारला आहे.
उधवा येथे मृत्युमुखी पडलेल्या बैलांची नुकानभरपाई आली असून ती संबंधित शेतकऱ्यांना वाटप केली आहे. इतर नुकसानभरपाई अजून प्राप्त झालेली नाही. आल्यावर तातडीने वाटप करण्यात येईल.
Apple पल पाठ्यपुस्तक, तहसीलदार
Comments are closed.