ग्रानाडात नेमबाजीचा गडगडाट, रायफल-पिस्तूल वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार आजपासून; मिश्र सांघिकमध्ये हिंदुस्थानी नेमबाजांकडून दमदार प्रारंभाची अपेक्षा
नेमबाजीत वाढलेले हिंदुस्थानचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करण्याची ही सुवर्णसंधी उद्यापासून सुरू होतेय. फक्त आता नेम अचूक लागतो का याकडे सर्वांचे लक्ष लागलेय. याच पार्श्वभूमीवर रायफल-पिस्तूल विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात होत असून, पहिल्याच दिवशी मिश्र सांघिक प्रकारात पदकांसाठी चुरस रंगणार आहे.
पहिल्याच दिवशी पदकांवर नाव
पहिल्याच दिवशी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकाराची पात्रता फेरीपासून अंतिम फेरीपर्यंत नेमबाजी पाहायला मिळणार आहे. त्यानंतर 10 मीटर एअर रायफलच्याही पदकाचा फैसला लागेल. पहिल्याच दिवशी पदकांचा निकाल लागणार असल्याने स्पर्धेची उत्पंठा शिगेला पोहोचली आहे.
पिस्तूलमध्ये अनुभव आणि आवड
आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती पलक गुलिया आणि ज्युनिअर विश्वविजेता मुकेश नेलवाली यांची जोडी हिंदुस्थानसाठी आशेचा किरण ठरणार आहे. तसेच सायन्यम आणि उज्ज्वल मलिक ही जोडीही भेदक कामगिरीसाठी सज्ज आहे. मात्र चीनच्या बलाढय़ जोडय़ा, तसेच तुर्कस्तान, सर्बिया, जर्मनी आणि हंगेरीच्या नेमबाजांमुळे स्पर्धा अधिकच रंगणार आहे.
रायफलमध्ये नव्या दमाची कसोटी
रायफल प्रकारात सोनम मस्कर-गजानन खंडागळे आणि श्रुती-अर्शदीप सिंग या जोडय़ा मैदानात उतरणार आहेत. चीनचे अव्वल नेमबाज प्रबळ दावेदार मानले जात असले तरी हिंदुस्थानी खेळाडू त्यांना जोरदार टक्कर देण्याच्या तयारीत आहेत.
ऑलिम्पिककडे वाटचाल
निवड धोरणानुसार नव्या नेमबाजांना संधी देत हिंदुस्थानने भविष्यासाठी भक्कम पायाभरणी केली आहे. वर्षअखेर दोहा येथे स्पर्धेत पुढील ऑलिम्पिकसाठी कोटा स्थान निश्चित होणार असल्याने, या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
Comments are closed.