उत्तराखंडमधील परिस्थिती अजूनही भयानक आहे.

पुढच्या 18 तासांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, साहाय्यता कार्यात वृष्टी, महापुराचे आहेत अडथळे

वृत्तसंस्था / उत्तरकाशी

उत्तराखंड राज्यात अतिवृष्टी, ढगफुटी आणि महापुरामुळे निर्माण झालेली परिस्थिती आणखी दोन दिवस अशीच राहील, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मंगळवारी उत्तरकाशी भागात झालेल्या तीन ढगफुटींमुळे अनेक नद्यांना अकस्मात महापूर आले आहे. त्यांच्यात अनेक घरे वाहून गेली असून 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. पुढच्या 18 तासांमध्ये राज्याच्या 18 जिल्ह्यांमध्ये मुसळधार वर्षा होईल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

सर्व प्रभावित भागांमध्ये बचावकार्य वेगाने केले जात आहे. त्यात पूर आणि पावसाचा व्यत्यय येत असला तरी पुरात अडकलेल्या नागरीकांना सुखरुप बाहेर काढण्याचे कार्य केले जात आहे. आतापर्यंत 150 हून अधिक नागरीकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. पूरग्रस्तांसाठी राज्यात सहा स्थानी साहाय्यता शिबिरे स्थापन करण्यात आली आहेत. तेथे हजाराहून अधिक पूरग्रस्तांची सोय करण्यात आली आहे. राज्याच्या उंच भागात असलेल्या धराली आणि अन्य खेड्यांमधील परिस्थिती अद्यापही आहे तशीच आहे. तेथे साहाय्यता सामग्री पाठविण्यात आली आहे. मंगळवारी धराली आणि सुक्की या दोन गावांमध्ये अचानक ढगफुटी झाल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. 200 घरे पडल्याचे अनुमान आहे.

सैन्य

भारत-तिबेट सीमा पोलीस दल, एनडीआरएफ आणि एसडीआरएफ ही साहाय्यता दले कार्यरत आहेत. भारतीय सेनेच्या तुकड्याही नियुक्त करण्यात आल्या आहेत. भारतीय वायुदलाने आपली सहा हेलिकॉप्टर्स नागरीकांची सुटका करण्यासाठी कामाला लावली असून त्यांच्या साहाय्याने अनेक नागरीकांना आणि पर्यटकांना आतापर्यंत सुरक्षित स्थळी सुखरुप नेण्यात आल्याची माहिती दिली गेली.

महाराष्ट्रातील पर्यटक अडकले

उत्तराखंडमधील पूर आणि ढगफुटीमुळे महाराष्ट्रातून तेथे पर्यटनासाठी गेलेले 56  जण अडकलेले आहेत. ते वेगवेगळ्या स्थानी अडकलेले असून त्यांना सुखरुप सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. हे पर्यटक नांदेड आणि सोलापूर येथील असल्याची माहिती देण्यात आली आहे. दिल्लीच्या महाराष्ट्र सदनमधून त्यांच्यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. ते सुखरुप असल्याचे समजते. त्यांच्यातील काही जणांनी आपल्या कुटुंबियांशी संपर्कही केला आहे.

धामी यांची भेट

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी उत्तरकाशीच्या पूरग्रस्त भागाला भेट दिली आहे. त्यांनी विविध साहाय्यता शिबीरांनाही भेटी देऊन तेथील नागरीकांची विचारपूस केली. साहाय्यता कार्यासाठी निधी किंवा साधनांची कमतरता होऊ दिली जाणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले असून साहाय्यता दलांच्या अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना दिल्या. अनेक जणांची सुटका करण्यासाठी त्यांनी या दलांचे आभारही मानले. लवकरच स्थिती सुधारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

 

Comments are closed.