मराठवाड्यावर आभाळ फाटले; अनेक भागांत अतिवृष्टीने हाहाकार

शनिवारी रात्री मराठवाड्यावर पुन्हा आभाळ फाटले. छत्रपती संभाजीनगरसह जालना, परभणी, धाराशीव आणि बीड जिल्ह्यांत पावसाने थैमान घातले आहे. बीडमधील सर्वच नद्यांना महापूर आल्याने ३२ गावांना पुराने वेढले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात १० मंडळांत अतिवृष्टी झाल्याने महाप्रलय झाला.
रात्री तब्बल २०० मिमी पाऊस कोसळला आहे. त्यामुळे नाथसागरचे सर्व २७ दरवाजे उघडण्यात आले असून सवा लाख क्युसेस प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. या तालुक्यात सर्वत्र पूर आला असून त्यात ल हानमोठी ६० जनावरे वाहून गेली. अनेक भागांत नद्या दुथडी भरून वाहत असल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून जनजीवनही विस्कळीत झाले आहे.
हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात शनिवारी रात्री पावसाने सर्वदूर हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी महापूर आल्याने हाहाकार माजला. बीडमधील ३२ गावांसह मराठवाड्यातील अनेक गावांना पुराचा वेढा पडला. पैठणमध्ये नाथसागरमध्ये मध्यरात्रीपासून पाण्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे जायकवाडी धरणाचे ९ आपत्कालीन दरवाजे उघडण्याचा निर्णय प्रशासनाने भल्या पहाटे घेतला. त्यामुळे प्रकल्पाचे सर्व २७दरवाजे साडेचार फूट वर करण्यात आले आणि सवा लाख क्युसेकचा जलविसर्ग करण्यात आला.
पैठण तालुक्यातील पाऊस
कचनेर (१०५.५ मिमी), पिंपळवाडी (११५.३ मिमी), बालानगर (१०५.५ मिमी), नांदर (२०८.८ मिमी), लोहगाव (१५८.० मिमी), ढोरकीन (१०४.५ मिमी), बिडकीन (८७.५ मिमी), पैठण (१९०.८ मिमी), पाचोड (१०७.५ मिमी) आणि विहामांडवा (१९९.३ मिमी).
Comments are closed.