युद्धाची ठिणगी प्रज्वलित झाली आहे!
जम्मूमध्ये पाकिस्तानी एफ-16 पाडले : उत्तरेकडील राज्यांमध्ये ‘ब्लॅक आऊट’ : आयपीएल सामनाही रद्द,पाकिस्तानचा जम्मू, राजस्थान, पंजाबमध्ये अनेक ठिकाणी ड्रोनद्वारे हल्ल्याचा प्रयत्न,भारताच्या ‘एस-400’ने रोखले पाकिस्तानचे हल्ले
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाताच गुरुवारी रात्री सीमेवर युद्धाची स्थिती निर्माण झाली होती. सायंकाळनंतर पाकिस्तानने भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणांनी बहुतांश सर्व हल्ले रोखले. त्यानंतर भारतानेही लाहोरसह अन्य शहरांवर प्रतिहल्ला केल्याने आता थेट दोन्ही देशांदरम्यान युद्धाची ठिणगी पडल्याचेच दिसत आहे. भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याने भारतीय लष्कराने पाकिस्तानचे एफ-16 लढाऊ विमानसह अन्य एक लढाऊ विमान पाडले आहे. सीमेवर झालेल्या ड्रोन हल्ल्यांना लष्कराच्या हवाई संरक्षण तुकड्यांनीही प्रत्युत्तर दिले.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, गुरुवारी पाकिस्तानने जम्मूमधील एका हवाई तळावर रॉकेट डागले. तथापि, भारतीय सैन्याच्या सतर्कतेमुळे आणि त्यांच्या शक्तिशाली हवाई संरक्षण यंत्रणेमुळे हा हल्ला पूर्णपणे हाणून पाडला गेला. दोन्ही देशातील वाढत्या तणावामुळे सीमेवरील सर्व राज्यांमध्ये ‘ब्लॅक आऊट’ जारी करण्यात आला. यादरम्यान धरमशाला येथे सुरू असलेला पंजाब-दिल्ली यांच्यातील सामनाही रद्द करण्यात आला.
भारतीय लष्कराच्या आधुनिक ए-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीने तातडीने कारवाई करत पाकिस्तानने डागलेल्या 8 क्षेपणास्त्रांना हवेतच उद्ध्वस्त केले. लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या क्षेपणास्त्रांचे लक्ष्य जम्मू हवाई पट्टी होती, परंतु वेळीच प्रत्युत्तर दिल्याने मोठे नुकसान टळले. पाकिस्तानी विमानांनी भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्यानंतर नियंत्रण रेषेजवळ मोठी कारवाई करण्यात आली. त्याचवेळी, पाकिस्तानने भारतीय सीमेवर अनेक ड्रोन पाठवल्यानंतर लष्कराच्या हवाई संरक्षण युनिट्सनी त्यांना वेळीच लक्ष्य करत ते निकामी केले. नियंत्रण रेषेजवळील केजी टॉप परिसरात पाकिस्तानी ड्रोन दिसल्याची माहिती दिली.
लाहोरपासून दूर रहाण्याचे अमेरिकन नागरिकांना निर्देश
भारताने पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी लाहोरच्या वायुसंरक्षण यंत्रणेवर हल्ला करून ती नष्ट केल्याने अमेरिकेने आपल्या नागरिकांना लाहोरपासून दूर राहण्याची दिशानिर्देश घोषित केले आहेत. लाहोरवर कदाचित आणखी मोठा हल्ला होऊ शकतो. त्यामुळे पाकिस्तात गेलेल्या अमेरिकन नागरीकांनी आणि पर्यटकांनी सावध रहावे, शक्यतो लाहोरला जाणे टाळावे. स्वत:च्या सुरक्षेसाठी योग्य ती दक्षता घ्यावी. बाहेर फिरणे टाळावे, अशा सूचना अमेरिकेने आपल्या नागरीकांना केल्या आहेत. गुरुवारी भारताने पाकिस्तानच्या प्रतिहल्ल्याच्या असफल प्रयत्नाला प्रत्युत्तर म्हणून लाहोरच्या वायुसंरक्षण यंत्रणेवर हल्ला करुन ती उध्वस्त केली होती.
सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन
बुधवारच्या ऑपरेशन सिंदूर संबंधी माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने गुरुवारी सकाळी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत बहुतेक सर्व पक्षांच्या महत्वाच्या नेत्यांनी उपस्थिती दर्शविली. सिंदूर अभियान अद्याप संपलेले नसून त्याची कार्यवाही अद्यापही होत आहे, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बैठकीत दिली. तसेच बुधवारच्या घटनांचे विवेचन केले. गुरुवारी मध्यरात्री पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याच्या प्रयत्नांची आणि ते प्रयत्न निकामी केले गेल्याची माहितीही या बैठकीत केंद्र सरकारच्या वतीने देण्यात आली. विरोधी पक्षांनी केंद्र सरकारच्या कोणत्याही कृतीला पूर्ण समर्थन असल्याचा पुनरुच्चार केला.
चीनची रडार यंत्रणा निकामी
चीनने पाकिस्तानला दिलेली ‘एचक्यू 9’ ही रडार यंत्रणा कुचकामाची असल्याचे या दोन दिवसांमधील घटनांनी सिद्ध केले आहे. लाहोरच्या संरक्षणासाठी पाकिस्ताने ही यंत्रणा प्रस्थापित केली होती. तथापि, भारताच्या ड्रोन्सनी या रडार यंत्रणेचाच भेद केल्याने, एकतर ही यंत्रणा कमजोर आहे किंवा पाकिस्तानकडे तिचा उपयोग करण्याचे कौशल्य नाही, हे सिद्ध झाल्याची चर्चा संरक्षण वर्तुळात होत आहे.
‘हारोप’ने घडविला विनाश
लाहोरच्या वायुसुरक्षा व्यवस्थेला उद्ध्वस्त करताना भारताने इस्रायल आणि भारत यांनी संयुक्तरित्या निर्मिलेली ‘हारोप’ ही विनाशकारी ड्रोन्स उपयोगात आणली आहेत. ही लॉएटरिंग श्रेणीतील ड्रोन्स आहेत. त्यांना कामिकेज असेही म्हणतात. ही ड्रोन्स आत्मघाती प्रकारची असून त्यांच्यात ड्रोन आणि क्षेपणास्त्र यांचे मिश्रण असते. ही ड्रेन्स आकाशात तरंगत राहतात आणि लक्ष्य दृष्टिपथात येताच अतिवेगाने त्यांच्यावर आदळून लक्ष्याचा खात्मा करतात. इस्रायल आपल्या शत्रूंच्या विरोधात याच घातक शस्त्राचा उपयोग करतो, अशी माहिती आहे.
हारोपची वैशिष्ट्यो आकड्यांमध्ये…
- पल्ला : 1,000 किलोमीटरपेक्षा अधिक
- तरंगण्याची क्षमता : सहा तास
- वजन: 135 किलो
- स्फोटके : 23 किलोग्राम अत्युच्च स्फोटक्षमता
- नियंत्रण प्रणाली : इलेक्ट्रो-ऑप्टिकल रडाररोधी सेन्सर
- वेग : अधिकतर 185 किलोमीटर प्रतितास
- डागण्याचे स्थान : भूमीवरुन भूमीवर किंवा कॅनिस्टर व्यवस्था
पाकिस्तानचा शेअरबाजार धाराशायी
भारताच्या धडाक्याचा तडाखा पाकिस्तानच्या शेअरबाजारालाही बसला असून बुधवारी तो 3,500 अंकांनी तर गुरुवारी 6 हजारांहून अधिक अंकांनी कोसळला आहे. यामुळे पाकिस्तानी गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. भारताचा शेअरबाजार मात्र आपला समतोल राखून भारताचा पराक्रम पहात आहे.
पंतप्रधान मोदी-भूसेना प्रमुख भेट
गुरुवारच्या महत्वपूर्ण घटनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भारताचे भूसेना प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी विस्तृत चर्चा केली आहे. या संघर्षात अद्याप भारताची भूसेना आणि नौसेना यांचा सहभाग त्या मानाने मर्यादित आहे. तथापि, संघर्ष वाढल्यास आणि त्याने युद्धाचे स्वरुप धारण केल्यास या दोन्ही दलांना महत्वाची भूमिका साकारावी लागणार आहे. कदाचित या बिंदूवरच चर्चा करण्यासाठी त्यांची भेट झाली असावी, असे अनुमान व्यक्त करण्यात येत आहे. त्यानंतर गुरुवारी रात्रीही पंतप्रधानांनी एनएसए अजित डोवाल यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा सुरूच होत्या. तत्पूर्वी, गुरुवारी दुपारी पंतप्रधानांनी सर्व सचिवांचीही बैठक घेतली.
सीमेवर पाकिस्तानचा गोळीबार
भारताशी दोन हात करण्यात अपयश आल्यामुळे चवताळलेल्या पाकिस्तानने आता आपला राग सीमावर्ती भागांमधील सर्वसामान्य नागरिकांवर काढण्यास प्रारंभ केला आहे. बुधवारी आणि गुरुवारी पाक रेंजर्सनी नागरी वस्त्यांवर केलेल्या गोळीबारात 16 भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यात चार बालके आणि तीन महिलांचा समावेश आहे. तथापि, भारतानेही पाकिस्तानला त्याच्याच भाषेत प्रत्युत्तर देताना पाकिस्तानी चौक्यांवर गन्स, उखळी तोफा आणि लहान शस्त्रांचा भडिमार चालविला असून पाकिस्तानचीही मोठ्या प्रमाणात हानी केली आहे. काही सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानचे 24 सैनिक गतप्राण झाले आहेत.
गुरुद्वारांवर हल्ला करण्याचा उद्दामपणा
धर्मांध पाकिस्तानी लष्कराने गुरवारी पंजाबमधील काही महत्वाच्या गुरुद्वारांवरही हल्ला करण्याचा असफल प्रयत्न केला आहे. गुरुद्वारा ही शीखांची पवित्र स्थाने आहेत. त्यांना लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्नही हाणून पाडण्यात आला असून सर्व गुरुद्वारा पूर्णत: सुरक्षित आहेत, अशी माहिती विदेश विभागाने दिली. पाकिस्तान जाणून बुजून भारतीयांच्या धार्मिक भावना भडकाविण्याचा प्रयत्न करीत असून तो त्याच्याच अंगलट येणार आहे, असे अनेक तज्ञांचे मत आहे.
Comments are closed.