भारतीय हवाई दलाची शक्ती वाढेल
लढाऊ विमानांच्या ताफ्यासाठी स्वदेशी अँटी-एअरफील्ड शस्त्र
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय वायुदलाला लवकरच स्वदेशी अँटी-एअरफील्ड शस्त्राचे एक अत्याधुनिक वर्जन मिळणार आहे. हे शस्त्र वायुदलाच्या एसयू-30एमकेआय समवेत जवळपास सर्व लढाऊ विमानांच्या ताफ्यावर लावले जाणार आहे. या शस्त्रामुळे वायुदलाचे सामर्थ्य वाढणार आहे. स्मार्ट अँटी-एअरफील्ड वेपन (एसएएडब्ल्यू) एकप्रकारचा बॉम्ब असून तो आकाशातून टाकला जातो. हा बॉम्ब 100 किलोमीटर अंतरावरील लक्ष्यालाही अचूकपणे नष्ट करू शकतो. हा बॉम्ब उपग्रहाने निर्देशित असतो. या बॉम्बसाठी भारतीय वायुदलाच्या प्रस्तावावर संरक्षण मंत्रालयाकडून लवकरच चर्चा केली जाणार आहे.
डीआरडीओकडून निर्मिती
एसएएडब्ल्यूची डीआरडीओकडून निर्मिती करण्यात आली आहे. या बॉम्बला स्वदेशी स्वरुपात विकसित आणि डिझाइन करण्यात आले असून याचे वजन 120 किलोग्रॅम आहे. कमी वजनाचा उच्च परिशुद्धता असलेला निर्देशित बॉम्ब जागतिक स्तरीय शस्त्रास्त्र प्रणालींपैकी एक आहे.
शत्रूचा वायूतळ करणार नष्ट
एसएएडब्ल्यू डीआरडीओच्या हैदराबाद येथील संशोधन केंद्रात स्वदेशी स्वरुपात डिझाइन आणि विकसित करण्यात आला आहे. याचा उद्देश शत्रूच्या वायुतळावरील रडार, बंकर, धावपट्टी, टॅक्सी ट्रॅक इत्यादी सुविधा क्षणात नष्ट करणे आहे.
संरक्षण मंत्रालयाकडून होणार चर्चा
यासंबंधीच्या प्रस्तावावर संरक्षण मंत्रालयाकडून लवकरच चर्चा होणार आहे. भारतीय सैन्य भविष्यातील युद्धं पाहता दीर्घ पल्ल्याच्या स्टँड ऑफ वेपन सिस्टीमचा शोध घेत असताना हे पाऊल उचलले जात आहे.
यशस्वी प्रकल्पांपैकी एक
एसएएडब्ल्यू हा डीआरडीओच्या यशस्वी प्रकल्पांपैकी एक आहे. डीआरडीओने या शस्त्रास्त्राला लवकरात लवकर सैन्याला पुरविण्यासाठी आपत्कालीन खरेदी प्रक्रियेच्या अंतर्गत संरक्षण दलांना एसएएडब्ल्यू क्षेपणास्त्रांची ऑफर दिली आहे. भारतीय वायुदल अधिक सामर्थ्यशाली होण्यासाठी क्षेपणास्त्रs आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानांना सामील करत आहे.
Comments are closed.