बाबर आझमसाठी टी-20 संघाचे दरवाजे अजूनही उघडे, हेड कोचचा खुलासा! स्ट्राईक रेटवर दिला खास सल्ला

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 2025 आशिया कपसाठी (Asia Cup 2025) रविवारी 17 खेळाडूंचा संघ जाहीर केला. पण स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार बाबर आझमला (Babar Azam) संघात स्थान मिळाले नाही. यानंतर चर्चा सुरू झाली की, बाबर आता टी-20 संघाच्या योजनांमध्ये नाही. याचदरम्यान पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांनी बाबर आझमबाबत मोठा खुलासा केला. त्यांनी सांगितले की, आशिया कपमधून त्याला वगळताना त्याला स्ट्राईक रेट सुधारण्याचा सल्ला दिला आहे.

प्रेस कॉन्फरन्समध्ये माईक हेसन म्हणाले, फक्त तीन सामन्यांच्या आधारे एखाद्या खेळाडूच्या फॉर्मवर प्रश्न उपस्थित करणे कठीण आहे. यात काही शंका नाही की बाबर आझमला स्पिन गोलंदाजीविरुद्ध आपला स्ट्राईक रेट वाढवण्यास सांगितले आहे. यावर तो खूप मेहनत घेत आहे.

बाबर यंदाच्या वर्षाअखेरीस बिग बॅश लीगमध्ये अ‍ॅडलेड स्ट्राईकर्सकडून खेळणार आहे. हेसन यांच्या मते, या लीगमुळे बाबरला दमदार पुनरागमनाची संधी मिळेल. ते म्हणाले, बाबरसारख्या खेळाडूकडे बिग बॅश लीगमध्ये खेळण्याची उत्तम संधी आहे. तिथे तो दाखवू शकतो की टी-20 फॉरमॅटमध्ये कोणत्या बाबतीत सुधारणा करत आहे. तो इतका मोठा खेळाडू आहे की त्याला दुर्लक्षित करणे शक्य नाही.

बाबर आझमव्यतिरिक्त विकेटकीपर फलंदाज मोहम्मद रिजवानलाही (Mohmmed Rizwan) ट्राय सीरीज आणि आशिया कपसाठी निवडलेल्या संघात स्थान मिळालेले नाही. दोघांनीही गेल्या वर्षी डिसेंबरपासून पाकिस्तानकडून एकही टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. हे दोघेही पाकिस्तानच्या टी-20 फॉरमॅटमधील सर्वाधिक धावा करणारे अव्वल दोन फलंदाज आहेत.

30 वर्षीय बाबर आझमच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये 39.83 च्या सरासरीने 4,223 धावा आहेत. या फॉरमॅटमध्ये तीन शतकं झळकावणारा तो एकमेव पाकिस्तानी फलंदाज आहे.

Comments are closed.