लक्ष्य आमिर खान होता, टायगर श्रॉफ नव्हे! बिश्नोई टोळीचा प्लॅन कसा बदलला? जाणून घ्या
अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबार प्रकरमामध्ये आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामागे असलेल्या संशयित आरोपींचं सुरुवातीचं लक्ष्य अभिनेता आमिर खान होता. मात्र, आमिर खानच्या हालचालींवर पाळत ठेवल्यानंतर त्याला लक्ष्य करणं कठीण असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी आपला मोर्चा टायगर श्रॉफकडे वळवल्याचा संशय आहे.
‘द इंडियन एक्स्प्रेस’ने पोलिस सूत्रांच्या हवाल्याने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या व्यक्तींनी मुंबईत सुमारे महिनाभर मुक्काम केला होता. या काळात त्यांनी आमिर खान राहत असलेल्या परिसराची किमान तीन वेळा पाहणी केली होती. मात्र, आमिर खान अनेकदा चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी बाहेर असायचा किंवा काही दिवस घराबाहेर पडत नसे. त्यामुळे त्याच्या हालचालींचा अंदाज घेणं संशयितांना कठीण जात असल्याचं सांगितलं जात आहे. आमिर खानला लक्ष्य करण्याच्या कथित योजनेत अडचणी येत असल्याचं लक्षात आल्यानंतर संशयितांनी दुसऱ्या अभिनेत्याला लक्ष्य करण्याचा निर्णय घेतल्याचा दावा पोलिस सूत्रांनी केला आहे. त्यानंतर टायगर श्रॉफ त्यांच्या निशाण्यावर आल्याचं सांगितलं जात आहे.
टायगर श्रॉफ हा बरेचदा रविवारी जुहू परिसरातील एका उद्यानात फुटबॉल खेळण्यासाठी जात असे. या नियमित दिनक्रमाची माहिती संशयितांना होती का, याचाही तपास सुरू असल्याचं वृत्तात नमूद करण्यात आलं आहे. १८ ऑक्टोबर रोजी जुहू येथील उद्यानात टायगर श्रॉफला लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाची पार्श्वभूमी जुलै महिन्यातील एका धमकीशी जोडली जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या स्क्रीनशॉट आणि ऑडिओ क्लिपमध्ये आरझू बिश्नोई नावाच्या व्यक्तीने स्वतःचा लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध असल्याचा दावा करत आमिर खानला धमकी दिल्याचं सांगितलं जातं. ५ जुलै रोजी आमिर खान आणि गौरी स्प्राट यांच्या विवाहाचा संदर्भ देत, हा विवाह ‘सनातन धर्म आणि राष्ट्राच्या विरोधात’ असल्याचा आरोप या संदेशांतर्गत करण्यात आला होता. टोळी अशा गोष्टी सहन करणार नाही आणि लवकरच प्रत्युत्तर देईल, असा इशाराही कथित संदेशातून देण्यात आल्याचं वृत्त आहे.
Comments are closed.