दिल्लीतील जैन मंदिरातून कलश चोरी
30 किलो वजनाचा कलश रात्रीत गायब : सुमारे 40 लाख किंमत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ईशान्य दिल्लीतील ज्योतीनगर येथील एका जैन मंदिरात चोरीची घटना घडली आहे. सुमारे 40 लाख रुपयांचा 30 किलो वजनाचा सोन्याचा मुलामा दिलेला कलश चोरीला गेला आहे. शनिवारी रात्री लोक करवा चौथ साजरा करत असताना ही घटना घडली. मंदिरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही चोरी कैद झाली आहे. मंदिर प्रशासनाने याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असून सीसीटीव्हीमधील दृश्यांच्या सहाय्याने चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील एका जैन धार्मिक कार्यक्रमातून सुमारे 1 कोटी रुपयांच्या चोरीची घटना ताजी असतानाच काही दिवसांनंतर ही दुसरी घटना घडली आहे.
जैन मंदिरातून चोरीला गेलेला कलश अंदाजे 25 ते 30 किलो वजनाचा असून तो तांबे आणि सोन्यापासून बनलेला आहे. संपूर्ण चोरी मंदिर परिसरात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. शनिवारी रात्री उशिरा ही चोरी होत असताना परिसरातील बहुतेक लोक करवा चौथ उत्सव साजरा करण्यात व्यग्र होते. आरोपी विद्युत खांबाचा वापर करून मंदिराच्या छतावर चढला. त्यानंतर सोन्याचा मुलामा दिलेला कलश काढून पळून गेल्याचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये रात्री 11:45 च्या सुमारास एक तरुण बाहेर फिरताना दिसत आहे. आता जवळच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज वापरून संशयिताची ओळख पटवण्याचे आणि त्याला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Comments are closed.