मोहम्मद सिराजच्या यशामागील त्रिसूत्री! जाणून घ्या सिराजच्या आईचा भावनिक खुलासा
ओव्हल कसोटी सामन्यात मोहम्मद सिराजने (Mohmmed Siraj) 9 विकेट्स घेत भारतीय संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. पाचही सामने खेळत अद्भुत फिटनेसचा प्रत्यय घडवत सिराजने 185 षटकं टाकत 23 विकेट्स पटकावल्या. ओव्हल कसोटीत 9 विकेट्ससह थरारक विजयाचा सिराज शिल्पकार ठरला.
मोहम्मद सिराजसाठी कोणत्याही दौऱ्यापूर्वी आणि दौरा झाल्यानंतर वडिलांच्या कबरीला भेट देणं हे नेहमीच ठरलेले असते. कोणत्याही दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी सिराज कबरीपाशी जातो आणि त्यांचे आशीर्वाद घेतो. दौरा संपवून तो हैदराबादमध्ये परतला की विमानतळावरून थेट कबरीस्थळी जातो. त्यांना आदरपूर्वक वंदन करूनच तो घरी परततो.
2021 मध्ये भारतीय संघ (team india) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना सिराजच्या वडिलांचं निधन झालं. तेव्हापासून त्याचं हे काम पक्कं होऊन गेलं आहे. सिराजचे वडील रिक्षा चालवायचे. सिराजचं क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न प्रत्यक्ष साकारण्यात वडिलांचा सिंहाचा वाटा आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सिराजची आई आणि भावाने त्याच्या वाटचालीविषयी सविस्तर माहिती दिली.
जून महिन्यात इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी सिराजने त्याचं सामान भरलं. आईला मिठी मारली आणि म्हणाला, आई- तुझ्या आशिर्वादाची गरज आहे. मी चांगलं खेळेन आणि भारताला जिंकून देईन. मला भारतासाठी सर्वोत्तम कामगिरी करायची आहे. यानंतर तो वडिलांच्या कबरीपाशी पोहोचला. त्यांच्या स्मृतीला अभिवादन करून सिराज विमानतळाच्या दिशेने रवाना झाला.
सिराजचं वडिलांवर प्रचंड प्रेम होतं. वडिलांचाही तो लाडका होता. त्यांच्यासाठी तो काहीही करायला तयार असे. माझ्या सदिच्छा कायम त्याच्याबरोबर आहेत. परमेश्वर त्याच्या पाठीशी राहो आणि असंच यश मिळत राहो. असं सिराजच्या आई शबाना बेगम यांनी सांगितलं.
शबाना सिराजचा प्रत्येक सामना पाहतात. अँडरसन-तेंडुलकर मालिकेचा (Anderson Tendulkar Trophy) प्रत्येक सामना त्यांनी निरखून पाहिला. सिराज खेळत असताना त्यांनी टाळ्या वाजवून, दिवसातून पाच वेळा प्रार्थना करत त्याला शुभेच्छा दिल्या. इस्लाम धर्मानुसार दिवसातून पाचवेळा नमाज पडतात. सिराज इंग्लंड दौऱ्यावर असताना शबाना यांनी प्रार्थनेची एकही वेळ चुकवली नाही.
त्यांच्या प्रार्थनेचं बळ सिराजच्या कामगिरीत प्रतीत झालं. भारतीय संघाने पाच सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत संपवली. सिराजने भारतीय गोलंदाजीचा प्रमुख या नात्याने पाचही कसोटी सामने खेळत संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
आई नेहमीच सिराजसाठी प्रार्थना करत असे. तिच्या शुभेच्छांमध्ये खूप बळ आहे. आईवडिलांच्या सदिच्छा पाठीशी असल्याने तसंच त्यांच्या पाठिंब्याच्या जोरावरच सिराजने ही वाटचाल केली आहे. तो रोज आईला व्हीडिओ कॉल करतो. उत्तरोत्तर अशीच प्रगती करत राहा असा आशीर्वाद आई त्याला देते, असं सिराजचा भाऊ मोहम्मद इस्माईलने सांगितलं.
वडील म्हणत असत की तुला मोठं नाव कमवायचं आहे. भारतासाठी खेळायचं आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना ते गेले. सिराजसाठी तो प्रचंड मोठा धक्का होता. त्याहीवेळेस अम्मीने त्याला सांगितलं की, जे व्हायचं होतं ते झालं. ते बदलता येणार नाही. आता तू सामन्यावर लक्ष केंद्रित करायला हवंस कारण वडिलांना तुला भारतासाठी खेळताना पाहायचं होतं.
वडिलांच्या निधनाची बातमी प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) आणि कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ही वाईट बातमी सिराजला दिली. हे कळल्यानंतर सिराज भावुक झाला. त्या दोघांनी सिराजला सावरलं आणि आधार दिला. संघ सहकाऱ्यांनीही त्याची भेट घेत त्याला आधार दिला. वडिलांच्या अंत्यविधीसाठी मायदेशी परतण्याचा प्रस्ताव संघव्यवस्थापनाने सिराजला दिला होता. मात्र देशासाठी खेळणं हे प्राधान्य असल्याने सिराजने ऑस्ट्रेलियातच थांबून खेळण्याचा निर्णय घेतला. सिराजने या कठीण परिस्थितीतही खेळताना 3 सामन्यात 13 विकेट्स पटकावल्या. यामध्ये त्याने डावात 5 विकेट्स घेण्याचीही कामगिरी केली. त्याने हे पंचक वडिलांना समर्पित केलं.
सिराजने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत तब्बल 185.3 षटकं टाकली. सिराजने मालिकेत तब्बल 1113 चेंडू टाकले. दोन्ही संघ मिळून सिराजने मालिकेत सर्वाधिक 23 विकेट्स पटकावल्या.
बाबांसाठी खेळायचं आहे, त्यांचं स्वप्न जगायचं आहे असं सिराज नेहमी सांगतो. फिटनेस हा त्याच्यासाठी अत्यंत आवडीचा विषय आहे. याचं श्रेय विराट कोहलीला जातं. विराटकडून त्याने प्रेरणा घेतली आहे. त्याच्यासाठी तो मोठ्या भावाप्रमाणेच आहे. आक्रमकता आणि जिंकण्याची ऊर्मी हे गुण त्याने विराटकडूनच घेतले आहेत, असं इस्माईलने सांगितलं.
2018 आयपीएल हंगामात सिराजला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. त्याच्या संघातील समावेशावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. पण त्यावेळी विराटने सिराजला पाठिंबा दिला. सिराजची क्षमता विराटला माहिती होती. आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना तसंच भारतासाठी खेळताना विराटने सिराजला संधी दिली. या सगळ्याचं श्रेय विराटला जातं. माझी कारकीर्द विराटला समर्पित असं सिराज अनेकदा म्हणतो आणि ते खरं आहे. सिराजला बिर्याणी प्रचंड आवडते. फिटनेस लक्षात घेऊन अलीकडे तो मर्यादित प्रमाणात खातो, असं इस्माईलने सांगितलं.
सामन्यानंतर बोलताना सिराजने फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्याकडून प्रेरणा घेतल्याचं सांगितलं. ओव्हल कसोटीच्या पाचव्या आणि अंतिम दिवशी ख्रिस्तियानो रोनाल्डोचा belief लिहिलेला वॉलपेपर डाऊनलोड केला. रोनाल्डो हा सिराजसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरला आहे. विकेट घेतल्यानंतर रोनाल्डो सियू अशा पद्धतीने आनंद साजरा केला जातो.
सिराजच्या खोलीत रोनाल्डोचे मोठमोठे पोस्टर आहेत. आम्ही पेंटहाऊसमध्ये राहतो. त्याने मिनी थिएटर उभारलं आहे. रोनाल्डोचे सामने तो नेमाने बघतो. त्याची कुठलीही मॅच तो कधीही चुकवत नाही. रोनाल्डोचा सामना सुरू असताना तो नेहमी आवाजी पाठिंब्यासह त्याला प्रतिसाद देतो’, असं इस्माईलने सांगितलं.
Comments are closed.