मराठमोळ्या भोंडल्याने जिंकली महिलांची मने
जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चैत्र नवरात्रोत्सवात सातव्या दिवशी सादर करण्यात आलेल्या ‘मराठमोळा भोंडला’ आणि ‘मराठी रसरंग’ या कार्यक्रमांनी ठाणेकरांचे लक्ष वेधून घेतले. मराठमोळ्या भोंडल्याने अंबा मातेच्या दर्शनासाठी आलेल्या महिलांची मने जिंकून घेतली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते-माजी खासदार राजन विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या चैत्र नवरात्रोत्सवात प्रत्येक दिवशी विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडत आहेत. सातव्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या ‘मराठमोळा भोंडला’ आणि ‘मराठी रसरंग’ हे कार्यक्रम मोठ्या सोहळ्याला चित्रपट अभिनेते आणि शिवसेना सचिव आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांनी भेट देऊन महिलांचा उत्साह द्विगुणित केला. किरण वेहेले प्रस्तुत ‘मराठी रसरंग’ कार्यक्रमात अनेक महिलांनी पारंपरिक भोंडला नृत्यावर ठेका धरला.
आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ठाण्याच्या जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या चैत्र नवरात्रोत्सवात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी देवीचे दर्शन घेत मनोभावे आरती केली.
शिवसेना नेते-आमदार अॅड. अनिल परब, आमदार सुनील प्रभू, शिवसेना नेते-माजी खासदार विनायक राऊत, माजी महापौर विशाखा राऊत यांनीही या नवरात्रोत्सवाला भेट देऊन अंबा मातेचे दर्शन घेतले. दरम्यान, या उत्सवात महिलांना पैठणी साड्या, सोन्याची नथ, चांदीचे पैंजण, मिक्सर, कुकर आणि गॅस शेगडीचे बक्षीस देऊन गौरवण्यात आले.
Comments are closed.