तरुणांचा आवाज ऐकलाच पाहिजे, काॅक्रोच आंदोलनाला राजकुमार रावचा पाठिंबा; भावनिक पोस्ट करत केलं शांततेचं आवाहन
दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या काॅक्रोचच्या विद्यार्थी आंदोलनाला बॉलिवुडमधून वाढता पाठिंबा मिळत आहे. शबाना आझमी, प्रकाश राज यांच्यानंतर आता अभिनेता राजकुमार राव यानेही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली आहे. शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, संवाद आणि न्याय्य तोडगा यांची गरज अधोरेखित करत त्याने तरुणांचा आवाज ऐकण्याचे आवाहन केले आहे.
राजकुमार रावने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले की, “जेव्हा तरुणांना असे वाटते की त्यांचे कोणी ऐकत नाही, तेव्हा समाजाने त्यांचा आवाज ऐकला पाहिजे. प्रत्येक मताचा सन्मान आणि आदर राखला गेला पाहिजे. शांतता हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे. कोणत्याही बाजूने होणारी हिंसा प्रश्न अधिक गुंतागुंतीचे करते आणि समाधानापासून दूर नेते. ही वेळ संवाद, समजूतदारपणा आणि करुणेची आहे.”
त्याने पुढे विद्यार्थ्यांनाही शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले. “विद्यार्थ्यांनी आपली मते जबाबदारीने आणि शांततेने मांडली पाहिजेत. त्याचवेळी प्रशासनानेही संवेदनशीलता दाखवत विद्यार्थ्यांचे म्हणणे खुलेपणाने ऐकले पाहिजे. कोणत्याही समस्येचा कायमस्वरूपी तोडगा संघर्षातून नव्हे, तर संवादातूनच निघतो. देशाच्या प्रगतीचा सर्वात भक्कम पाया म्हणजे न्याय्य आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्था,” असेही त्याने नमूद केले.
दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरण आणि शिक्षण व्यवस्थेतील कथित अनियमिततेविरोधात सीजेपीच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी आंदोलन सुरू आहे. 20 जुलैला झालेल्या ‘संसद चलो’ मोर्चादरम्यान पोलिसांकडून झालेल्या कारवाईनंतर हा मुद्दा अधिक चर्चेत आला. या घटनेनंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली असून, शबाना आझमी, प्रकाश राज, प्रतिभा रांता यांच्यासह अनेकांनी शांततापूर्ण संवादातून प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे.
Comments are closed.