13 वर्षांचा वनवास संपला! ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर जो रूटने झळकावले कारकिर्दीतील पहिले कसोटी शतक!
13 वर्षे आणि 30 डावांच्या मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर जो रूटचा (Jo Root) ऑस्ट्रेलियातील ‘वनवास’ संपला आहे. गाबाच्या मैदानावर इंग्लिश फलंदाजाने अशी कामगिरी केली, जी आजवर झाली नव्हती. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया (ENG vs AUS) यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रूटने शानदार प्रदर्शन करत शतकी खेळी केली आहे.
रूटने स्कॉट बोलँडच्या चेंडूवर चौकार मारून आपल्या कसोटी कारकिर्दीतील 40 वे शतक पूर्ण केले. 30 डावांनंतर रूटच्या बॅटमधून ऑस्ट्रेलियामध्ये हे पहिले कसोटी शतक आले आहे. बेन डकेट (Ben Duckket & Ollie pope) आणि ओली पोप लवकर बाद झाल्यामुळे, रूटला तिसऱ्याच षटकात मैदानात उतरावे लागले.
स्टार्कच्या भेदक गोलंदाजीसमोर रूट एका खडकाप्रमाणे उभा राहिला आणि त्याने तिसऱ्या विकेटसाठी जॅक क्राउलीसोबत मिळून 117 धावांची भागीदारी केली. क्राउली बाद झाल्यानंतरही रूटने मोर्चा सांभाळला आणि ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर पहिले कसोटी शतक झळकावले. रूटला ऑस्ट्रेलियात पहिले शतक करण्यासाठी 13 वर्षे लागली. अखेर गाबा येथे त्याची वर्षांनुवर्षांची प्रतीक्षा संपली.
जो रूट गाबाच्या मैदानावर कसोटीच्या पहिल्याच दिवशी शतकी खेळी करणारा दुसरा इंग्लिश फलंदाज ठरला आहे. तसेच, या ऐतिहासिक मैदानावर इंग्लंडकडून शतक ठोकणारा तो एकूण आठवा फलंदाज बनला आहे. ऑस्ट्रेलियात पहिले शतक करण्यासाठी रूटला 16 कसोटी सामने आणि एकूण 30 डाव खेळावे लागले. रूट वगळता हॅरी ब्रूक (31 धावा) आणि कर्णधार बेन स्टोक्स (19 धावा) वगळता इतर फलंदाजांना फारसा टिकाव धरता आला नाही. जेमी स्मिथला तर खातेही उघडता आले नाही.
Comments are closed.