संपूर्ण पाकिस्तान आता टप्प्यात आहे

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारताने पाकिस्तानविरोधात केलेल्या ‘सिंदूर’ अभियानाने हे सिद्ध केले आहे की, आता संपूर्ण पाकिस्तान आमच्या शस्त्रास्त्रांच्या टप्प्यात आला आहे. खैबर पख्तुनख्वापासून सिंध प्रांताच्या पश्चिम टोकापर्यंत कोठेही आमची शस्त्रास्त्रे आता पोहचू शकत आहेत, अशी माहिती भारताच्या भूसेना वायुसंरक्षण विभागाचे अधिकारी सुमेर इव्हान डीकुन्हा यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.

भारताच्या माऱ्यामुळे घाबरुन आता पाकिस्तानने आपले लष्करी मुख्यालय रावळपिंडीतून हलवून खैबर पख्तुनख्वा येथे नेण्याचा विचार चालविला आहे. भारताच्या हल्ल्यात या मुख्यालयाचीही मोठी हानी झाली होती. त्यामुळे पाकिस्तानने हा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. तथापि, तेथे जरी हे मुख्यालय स्थापन केले, तरी ते आमच्या माऱ्यातून सुटणार नाही, हे स्पष्ट झाल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

त्यांना खोलवर जावे लागेल

भारताच्या माऱ्यापासून वाचायचे असेल तर त्यांना भूमीखाली अतिशय खोलवर आपले मुख्यालय आणि इतर लष्करी आस्थापने स्थापन करावी लागतील. ज्यास्थानी पाकिस्तानची पश्चिम सीमा भारताच्या सीमेपासून सर्वात कमी अंतरावर आहे किंवा सर्वात अधिक अंतरावर आहे, अशा कोणत्याही स्थानी आम्ही पोहचू शकतो, असे आता निर्विवादपणे स्पष्ट झाले असल्याचे डीकुन्हा यांनी अभिमानाने स्पष्ट केले.

1000 ड्रोन्स केले नष्ट

पाकिस्तानने भारतावर मोठ्या प्रमाणात ड्रोन्सचा हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. ड्रोन्सच्या लाटांवर लाटा सोडण्यात आल्या होत्या. तथापि, हे सर्व ड्रोन्स नष्ट करण्यात आमची यंत्रणा यशस्वी ठरली आहे. पाकिस्तानचे 800 ते 1,000 ड्रोन्स या चार दिवसांच्या अभियानात नष्ट करण्यात आले आहेत. पाकिस्तानची अनेक क्षेपणास्त्रेही अशाच प्रकारे नष्ट करण्यात आली आहेत. भारताची जी हानी झाली आहे, ती पाकिस्तानने सीमाप्रदेशात केलेल्या गोळीबारामुळे झाली आहे. त्यामुळे भारताला कोणतीही विशेष झळ पोहचलेली नाही. पाकिस्तानच्या गोळीबारात काही नागरिकांनी प्राण गमावले असले तरी ड्रोन्स किंवा क्षेपणास्त्रे यांच्यामुळे कोणीही भारतीय नागरिक मृत्यू पावलेला नाही. असे डीकुन्हा यांनी प्रतिपादन केले.

भारताने केला होता सराव

पाकिस्तान भारतावर ड्रोन्सचा हल्ला करणार हे आम्ही आधीपासूनच ताडले होते. पाकिस्तान अत्यंत स्वस्त अशा स्वरुपातील आणि कमी उंचीवरुन उडणाऱ्या ड्रोन्सचा उपयोग करणार, हे ही आम्हाला माहीत होते. त्यामुळे असे ड्रोन्स नष्ट करण्याचा सराव आम्ही या संघर्षापूर्वीच केला होता. अशा प्रकारच्या ड्रोन्सचा मारा कसा करता येतो आणि तो कसा थोपविता येतो, याचे प्रात्यक्षिक आम्ही केले होते. त्यामुळे आमच्या सर्व यंत्रणा सज्ज होत्या. ही प्रात्यक्षिके आम्ही 26 एप्रिल ते 28 एप्रिल या कालावधीत केली होती, अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

अभिमानास्पद कार्य

या चार दिवसांच्या संघर्षात प्रारंभापासून आमचे वर्चस्व राहिले होते. पाकिस्तानने आमचे सुरक्षा कवच भेदण्याचा वारंवार प्रयत्न केला. तथापि, त्यांचा प्रत्येक प्रयत्न उधळून लावण्यात आला. पाकिस्तानकडे तुर्किये आणि चीन यांनी पुरविलेली ड्रोन्स होती. तसेच अत्याधुनिक मानली गेलेली क्षेपणास्त्रेही होती. तथापि, त्यांची यंत्रणा आमच्या सामर्थ्यासमोर टिकाव धरु शकली नाही. कारण आमची यंत्रणा सरस आहे. आम्ही पाकिस्तानमध्ये खोलवर प्रहार करण्याच्या परिस्थितीत आहोत. चीननेही पाकिस्तानला मोठे साहाय्य अबोलपणे केले असल्याची शक्यता आहे. तथापि, ती मात्राही चालली नाही, ही वस्तुस्थिती त्यांनी स्पष्ट केली आहे.

 

Comments are closed.