त्यांचा राजकीय डाव साध्य होईल, पण राज्याचं नुकसान होतंय, त्याचं काय? रोहित पवार भाजपवर संतापले

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. भाजपच्या या राजकारणावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. यातून कदाचित भाजपाचा राजकीय डाव साध्य होईल, पण राज्याचं मात्र नुकसान होतंय, त्याचं काय? असा सवाल करत रोहित पवार यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
रोहित पवार यांनी याबाबत एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, राज्यातील ऊस उत्पादनातील वाढीच्या माध्यमातून साखर उद्योगाला चालना देण्यात मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा (VSI) सर्वांत मोठा वाटा आहे. आदरणीय पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली मा. अजितदादांसह सर्वपक्षीय नेते पक्षाच्या पलीकडं जाऊन केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी गेल्या अनेक वर्षांपासून या संस्थेवर काम करतात. तरीही या संस्थेच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश ही केवळ नियमित प्रक्रिया नाही तर भाजपाने ‘ठाण्यानंतर’ आपला मोर्चा आता ‘बारामतीकडं’ वळवल्याचा त्याचा अर्थ आहे. भाजपला कुबड्यांची गरज नाही हे कालच गृहमंत्री अमित शाह साहेबांनी स्पष्ट केलं आणि सोबतच VSI च्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. हा कुबड्यांवरील अवलंबित्व कमी करण्याचा तर प्रयत्न नाही ना! हे लवकरच स्पष्ट होईल, असे त्यांनी म्हटले आहे.
राज्यातील ऊस उत्पादनातील वाढीच्या माध्यमातून साखर उद्योगाला चालना देण्यात मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा (VSI) सर्वांत मोठा वाटा आहे. आदरणीय पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली मा. अजितदादांसह सर्वपक्षीय नेते पक्षाच्या पलीकडं जाऊन केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी गेल्या अनेक… pic.twitter.com/n4Sz0dGPtO
– रोहित पवार (@RRPSpeaks) 28 ऑक्टोबर 2025
महत्त्वाचं म्हणजे जिथं आम्ही कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे देतो तिथं सरकार मौन बाळगतं, चौकशी करत नाही, पण राजकीय द्वेषातून एका चांगल्या संस्थेची चौकशी करून संस्थेचं नाव बदनाम केलं जातं, हे भाजपाचं आधुनिक राजकारण आहे. यातून कदाचित भाजपाचा राजकीय डाव साध्य होईल, पण राज्याचं मात्र नुकसान होतंय, त्याचं काय? असा सवाल रोहित पवार यांनी पोस्टद्वारे केला आहे.

Comments are closed.