Iran Israel War – …तर अमेरिका अधिकच भीषण संकटात सापडेल, अमेरिकन सुरक्षा तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर स्वदेशातूनच टीकेची झोड उठू लागली आहे. अमेरिकेचे ज्येष्ठ सुरक्षा तज्ज्ञ आणि व्हाईट हाऊसचे माजी सल्लागार रॉबर्ट पेप यांनी ट्रम्प यांच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना म्हटले आहे की, ट्रम्प सध्या एका मोठ्या राजकीय आणि लष्करी सापळ्यात अडकले आहेत. त्यांनी इराणमध्ये प्रत्यक्ष सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेतला तर, अमेरिका अधिकच भीषण संकटात सापडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

एका विशेष मुलाखतीत पेप यांनी विश्लेषण केले की, ट्रम्प यांनी सध्या जरी हल्ल्यांमध्ये काही दिवसांची स्थगिती जाहीर केली असली, तरी हा शांततेचा प्रयत्न नसून एक रणनीती आहे. अमेरिकन मरीन सैनिकांना इराणच्या सीमेजवळ पोहोचवण्यासाठी हा वेळ घेतला जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. जोपर्यंत अमेरिकन जहाजे आपला मार्ग बदलत नाहीत, तोपर्यंत युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. एकदा का अमेरिकन सैन्य तिथे पोहोचले की, होर्मुझच्या समुद्रधुनीवर इराणचे असलेले नियंत्रण पाहता जागतिक स्तरावर तेलाच्या किमती गगनाला भिडतील आणि जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीचे सावट अधिक गडद होईल.

पेप यांच्या मते, इराणचा ‘तेल महासत्ता’ म्हणून झालेला उदय ही अमेरिकेसाठी गेल्या 50 वर्षांतील सर्वात मोठी चिंतेची बाब ठरली आहे. मध्य-पूर्वेतील अमेरिकेच्या धोरणांचा मूळ उद्देशच असा उदय रोखणे हा होता. सद्यस्थितीत इराणला स्पष्ट फायदा मिळत असल्याचे चित्र असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी इस्रायलवर लष्करी मर्यादा आणणे हाच एकमेव पर्याय अमेरिकेसमोर शिल्लक आहे. नेतन्याहू सरकारने यापूर्वी अनेकदा दिलेली आश्वासने पाळलेली नसल्यामुळे केवळ अमेरिकेचे ठोस धोरणच या युद्धाची दाहकता कमी करू शकते, असे स्पष्ट मत पेप यांनी व्यक्त केले आहे.

Comments are closed.