…तर तुम्हालाच भोगावे लागेल! सौदीने इराणच्या हल्ल्यांचा निषेध करत दिला कठोर इशारा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे तणाव आणखी वाढला आहे. इराणकडून आखाती देशांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले होत असल्याने अनेक देशांनी सतर्कता वाढवली आहे, तर जागतिक बाजारातही त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. अबु धाबीमध्ये हवाई संरक्षण यंत्रणेने क्षेपणास्त्र अडवल्यानंतर त्याचे अवशेष पडून दोन नागरिक जखमी झाले. या घटनेनंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.

दरम्यान सौदी अरेबियाने इराणवर कडक शब्दात टीका केली आहे. इराणने केलेल्या हल्ल्यांसंदर्भात सौदीने निंदनीय असे म्हटले आहे. सौदीच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी दिलेल्या निवेदनात, इराणने आखाती देशांवर हल्ले सुरूच ठेवले तर त्याचा सर्वात मोठा तोटा इराणलाच सहन करावा लागेल, असा इशाराही दिला. आखाती प्रदेशातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, तुर्कीएने सहा F-16 लढाऊ विमाने आणि हवाई संरक्षण प्रणाली तैनात केली आहे.

या घडामोडींमध्ये मोहमेद बिन झाएद अल नाह्यन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केली. या संभाषणात गल्फ देशांवर झालेल्या इराणी हल्ल्यांबाबत आणि त्यातून निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला. तणाव वाढत असताना अमेरिकेने सावध पाऊल उचलत सौदी अरेबियातील आपल्या दूतावासातील गैर-आवश्यक कर्मचाऱ्यांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेतल्याचे सांगितले असून अमेरिकन नागरिकांना सध्या सौदी अरेबियाला प्रवास करण्याबाबत पुनर्विचार करण्याचा सल्लाही दिला आहे.

Comments are closed.