भारत-चीन सीमेवर घुसखोरीची एकही घटना घडलेली नाही!
केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांची संसदेत माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी भारताच्या आंतरराष्ट्रीय सीमांवरून मंगळवारी लोकसभेत महत्त्वाची माहिती दिली. भारत-चीन सीमेवर घुसखोरीचे एकही प्रकरण नोंदविले गेले नाही. 2014 पासून आतापर्यंत नोंद घुसखोरीच्या प्रयत्नांमध्ये भारत-बांगलादेश सीमेवर सर्वाधिक 7,528 प्रकरणे उघडकीस आली. भारत-पाकिस्तान समेवर 425, भारत-म्यानमार सीमेवर 298 तर भारत-नेपाळ आणि भूतान सीमेवर 157 प्रकरणे नोंद झाली आहेत. भारत-चीन सीमेवर घुसखोरीची एकही घटना नोंद झाली नसल्याचे राय यांनी स्पष्ट केले.
भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेची एकूण लांबी 2,289.66 किलोमीटर आहे, ज्यातील 2,135.136 किलोमीटर म्हणजेच 93.25 टक्के भागावर कुंपण उभारण्यात आले आहे. 154.524 किलोमीटर म्हणजेच 6.75 टक्के भाग अद्याप कुंपणाशिवाय असल्याची माहिती राय यांनी दिली. भारत-बांगलादेश सीमेची लांबी 4,096.70 किलोमीटर असून यातील 3,239.92 (79.08 टक्के) किलोमीटरवर कुंपण पूर्ण झाले आहे. 856.778 किलोमीटर म्हणजेच 20.92 टक्के भागावर हे काम शिल्लक अहे. 1,643 किलोमीटर लांब भारत-म्यानमार सीमेवर आतापर्यंत 9.214 किलोमीटर लांब कुंपणाचे काम पूर्ण झाल्याचे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले आहे.
54 किंवा विजय दिवस
तर राज्यसभेत 54 व्या विजय दिनानिमित्त भारतीय सशस्त्र दलांचे शौर्य आणि साहसाबद्दल कौतुकोद्गार काढण्यात आले. याच विजयामुळे क्षेत्राचे भू-राजकीय चित्र बदलले होते असे सभागृहात म्हटले गेले. राज्यसभा सभापती सी.पी. राधाकृष्णन यांनी 16 डिसेंबर 1971 च्या दिनी भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तानी सैन्यावर मिळविलेल्या विजयाचा उल्लेख केला. याच विजयामुळे बांगलादेश अस्तित्वात आला. या विजयाने न्याय, मानवी प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्याबद्दल भारताची प्रतिबद्धता पुन्हा सिद्ध केल्याचे उद्गार राधाकृष्णन यांनी काढले आहेत. दरवर्षी 16 डिसेंबर रोजी विजय दिन साजरा करण्यात येतो. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात लढणाऱ्या सैनिकांच्या सन्मानार्थ हा दिन साजरा करण्यात येतो.
Comments are closed.