MPL 2025: एमपीएलचे सर्व सामने पहा स्टेडियममध्ये जाऊन मोफत

देशातील लोकप्रिय क्रिकेट लीगपैकी एक असलेल्या महाराष्ट्र प्रिमीयर लीगला (MPL) 4 जूनपासून सुरुवात होत आहे. तसेच वुमेन महाराष्ट्र प्रिमीयर लीग अर्थात WMPLला 5 जूनपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेचे सर्व सामने महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होत आहे.

प्रेक्षकांना मोफत प्रवेश
MPLमध्ये 6 संघ सहभागी होत असून प्रत्येक संघ साखळी फेरीत 10 सामने खेळेल. या स्पर्धेत एकूण 34 सामने होणार असून अंतिम सामना 22 जून रोजी होणार आहे. या स्पर्धेचे सर्व सामने प्रेक्षकांना स्टेडियमवर मोफत पहायला मिळणार आहे. WMPL देखील याच काळात होत असल्याकारणाने ते सामने देखील प्रेक्षकांना इथे पहाता येतील. तसेच आपल्या आवडत्या संघाला पाठिंबा देता येणार आहे. लीगचे हे तिसरे वर्ष असून एमसीएचे अध्यक्ष आ. रोहित पवार यांनी प्रेक्षकांना मोफत एंट्रीची घोषणा यापुर्वीच केली आहे, तसेच फॅन्सने मोठ्या संख्येने स्टेडियमवर येऊन आपली टीम तसेच आवडत्या खेळाडूला पाठिंबा देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

ऑनलाईन व टीव्हीवरही सामने
ओटीटी प्लॅटफॉर्म जीओ हॉटस्टारवर प्रेक्षकांना MPL व WMPLचे सामने घरबसल्या पहायला मिळणार आहेत. तसेच स्टारस्पोर्ट्स चॅनेलवर टीव्हीच्या माध्यमातूनही सामने पहायला मिळणार आहेत. आपल्या गावातील, शहरातील क्रिकेटपटूला थेट टीव्हीवर पहाण्याचा आनंद प्रेक्षकांना या माध्यमातून घेता येईल.

MPL आणि WMPLबद्दल थोडक्यात
MPLचा हा तिसरा हंगाम असून एमसीएचे अध्यक्ष आ. रोहित पवार यांच्या संकल्पनेतून ही लीग सुरु झाली आहे. यापुर्वी 2023 व 2024च्या हंगामात या लीगचे रत्नागिरी जेट्स विजेते ठरले आहे. 2023मध्ये पुणेरी बाप्पा तर 2024मध्ये ईगल नाशिक टायटन्स उपविजेते ठरले होते. WMPL ही देशातील पहिली महिलांसाठी कोणत्याही राज्य क्रिकेट संघटनेने सुरु केलेली लीग आहे. गतवर्षी महिलांचे प्रदर्शनी सामने MPL दरम्यान झाले होते.

Comments are closed.