महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी माणूस यात तडजोड नाही! राज ठाकरे यांनी ठणकावले

बाळासाहेबांसह जे अनेकांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं… वीस वर्षांनंतर मी आणि उद्धव एका व्यासपीठावर आलो. मराठीसाठीची ही आपली एकजूट कायम राहायला हवी. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पुन्हा एकदा साकारावं अशी आशा, अपेक्षा आणि इच्छा आहे.

बाळासाहेबांनी 1999 मध्ये भाजपकडून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री गैरमराठी होत असल्याचा प्रस्ताव येताच सत्तेवर लाथ मारली. मराठी प्रेमाचे हेच संस्कार आमच्यावर झालेत. यातूनच मराठीचे बाळकडू मिळालेय. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांना हिंदी सक्ती रद्द करावी लागली, असे सांगतानाच मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्राबाबत कधीही तडजोड करणार नाही, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठणकावले.

महाराष्ट्रात कोणतीही गरज नसताना हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न केला गेल्याचे राज ठाकरे म्हणाले. फक्त मोर्चाच्या चर्चेनेच हिंदी सक्तीबाबत सरकारला माघार घ्यावी लागल्याचे त्यांनी सांगितले. कुणीही यावं आणि सत्ता आहे म्हणून कोणतीही सक्ती करावी हे चालणार नाही. तुम्हाला हा मजाक वाटतो काय? पण लक्षात ठेवा, तुमच्याकडे सत्ता असेल ती विधानसभेत, पण आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर, असे राज ठाकरे यांनी बजावले. माझ्या मराठीकडे, महाराष्ट्राकडे कुणी वेड्यावाकड्या नजरेने पाहायचे नाही, असा इशाराही त्यांनी दिला. केंद्र आणि राज्यामध्ये दुवा निर्माण व्हावा म्हणून हिंदी आवश्यक असल्याचे सांगितले जाते. म्हणजे हिंदी शिकल्यावर लगेच हिंदी चित्रपटात काम मिळणार का, असा सवालही त्यांनी केला.

कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा असल्याचे मी एका मुलाखतीमध्ये म्हटले होते. त्यानुसार आज उद्धव आणि मी 20 वर्षांनंतर एकत्र आलोय. आम्हाला एकत्र आणणं जे अनेकांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, असा सणसणीत टोलाही राज ठाकरे यांनी लगावला.

दक्षिणेत हिंदी सक्ती करून दाखवाल?
देशातील हिंदी भाषिक राज्ये मागास असून गैरहिंदी राज्ये आर्थिकदृष्टय़ा प्रगत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हिंदी भाषिक राज्यांतून लोक इकडे येतात. विशेष म्हणजे दक्षिणेतील राज्यामध्ये हिंदी सक्ती करून दाखवाल का? असा सवालही राज ठाकरे यांनी केला. दक्षिणेतील राज्ये यांना हिंग लावून विचारत नाहीत. केंद्राच्या शिक्षण धोरणात हिंदी सक्ती नाहीय. कोर्ट, सुप्रीम कोर्टामध्येही इंग्रजी भाषेमध्ये कारभार चालतो. मग महाराष्ट्रातच त्रिभाषा सूत्राचा प्रयोग का करता, असा सवालही त्यांनी केला. मात्र आता महाराष्ट्र पेटून उठतो तेव्हा काय होते हे सत्ताधाऱ्यांना कळले असेल. त्याशिवाय काय त्यांनी माघार घेतली? असेही ते म्हणाले. दक्षिण भारतात तमीळ, तेलगु प्रश्नावर कडवटपणे समोर येऊन उभे राहतात. त्यांना कोण विचारते का, तुमची मुलं कुठे शिकली? उद्या मी हिबरू भाषेत शिकून मराठी भाषेचा कडवट अभिमान बाळगीन. काय प्रॉब्लेम आहे, का असा सवालही त्यांनी केला. दक्षिण भारतातील इंग्रजीत शिकलेले नेते आणि अभिनेत्यांमध्ये जयललिता, स्टॅलिन, कनिमोझी, उदयनिधी, चंद्राबाबू नायडू, पवनकल्याण, नारा लोकेश, कमल हसन, अभिनेता विक्रम, सूर्या, संगीतकार ए. आर. रेहमान अशी यादीच त्यांनी वाचून दाखवली. देवेंद्र फडणवीस इंग्रजी माध्यमात शिकून मुख्यमंत्री झाले. दादा भुसे मराठी माध्यमात शिकून शिक्षण मंत्री झाले. असे असताना हिंदीची सक्ती का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. कुणाकुणाची मुले परदेशात शिकत आहेत याची यादी आमच्याकडे असल्याचेही ते म्हणाले. मंत्र्यांचे हिंदी ऐकून आपल्याला फेपरं येईल, असा टोलाही त्यांनी लगावला.

मराठ्यांनी कधी हिंदी लादली नाही!
मराठ्यांनी हिंद प्रांतावर तब्बल 125 वर्षे राज्य केले. मात्र त्या ठिकाणी मराठ्यांनी मराठी लादली नाही. गुजरात, राजस्थान, पंजाबमध्येही मराठे पोहोचले होते. शिवाय हिंदी भाषा महाराजांच्या काळातही नव्हती. मग आताच हिंदी सक्तीचा अट्टहास का, असा सवालही राज ठाकरे यांनी केला. अमित शहा काही दिवसांपूर्वी म्हणाले की, ‘इंग्रजी बोलता येते याची पुढे आपल्याला लाज वाटेल.’ यावर तुम्हाला इंग्रजी येत नसेल तर आम्ही काय करणार, असा टोलाही त्यांनी लगावला.

कडवटपणा आत असावा लागतो!
मुले इंग्रजी माध्यमात शिकली म्हणून काही जण आपल्यावर टीका करतात. मात्र सन्माननीय बाळासाहेब ठाकरे, माझे वडील श्रीकांत ठाकरे हेदेखील इंग्रजी माध्यमातून शिकले. बाळासाहेब इंग्रजी पेपरमध्ये व्यंगचित्र काढायचे. मात्र त्यांनी कधी मराठी अभिमानात कोणतीही तडजोड केली नाही. असे असताना आपण त्यांच्या मराठी प्रेमाबद्दल शंका घेणार का? असा सवालही राज ठाकरे यांनी केला. लालकृष्ण आडवाणी ख्रिश्चन मिशनरीत शिकले म्हणून त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का? असेही ते म्हणाले. कडवटपणा शिक्षण कुठे घेतले यावर नाही, तर आतमध्ये असावा लागतो, असे राज ठाकरे म्हणाले.

बाळासाहेबांचं स्वप्न पुन्हा साकारावं!
मराठी माणसाच्या एकजुटीमुळे सत्ताधाऱ्यांना हिंदी सक्तीचा निर्णय रद्द करावा लागला. त्यामुळे मराठीची ही एकजूट कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये बाळासाहेबांचे जे स्वप्न होते ते पुन्हा साकारावे, अशी अपेक्षा व्यक्त करतो, असेही राज ठाकरे म्हणाले.

मातृभाषेसाठी ए. आर. रेहमानने व्यासपीठ सोडले
ए. आर. रेहमान तामीळनाडूत एका कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित होता. यावेळी निवेदक महिला तमीळ बोलत होती. मात्र तिने अचानक हिंदी बोलायला सुरुवात केली. यावेळी ‘हिंदी?’… असा सवाल करीत त्याने थेट व्यासपीठ सोडल्याचेही त्यांनी सांगितले. तुमचा कडवटपणा शिक्षण कुठे घेतले यात नाही तर तो आत असावा लागतो, असेही ते म्हणाले. म्हणे एक भाषा सर्वांना बांधून ठेवते. कुठची एक भाषा? आजपर्यंत काय वाकडं झालं, असा सवालही त्यांनी केला.

त्रिभाषा सूत्र केंद्र आणि राज्यातील केवळ दुवा
केंद्र आणि राज्य सरकारमधील केवळ दुवा म्हणून त्रिभाषा सूत्र आणण्यात आले होते असेही ते म्हणाले. त्याची सक्ती का करता असेही राज ठाकरे म्हणाले. बिहार, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशमध्ये कोणती तिसरी भाषा आणणार, असा सवालही यावेळी राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

तेव्हा भाषेचा प्रश्न येतो कुठे!
संरक्षण खात्यात मद्रास रेजिमेंट, रजपूत रायफल, शीख रेजिमेंट, पॅराशूट, पंजाब, मराठा इप्रंटी, आसाम, बिहार, महार रेजिमेंट, जम्मू कश्मीर रेजिमेंट आहे, गुरखा रायफल लडाख, अरुणाचल आणि सिक्कीम स्काऊट आहे. संरक्षण खात्यात अशी वेगवेगळ्या राज्यांची रेजिमेंट असतात. शत्रू दिसला की तुटून पडतात ना? मग भाषेचा प्रश्न येतो कुठे, असा सवालही त्यांनी केला. देशात जेव्हा प्रांतरचना झाली ती भाषांचे भाग होते म्हणूनच ना? असे ते म्हणाले.

आता हे जातीचे कार्ड खेळतील
मराठीसाठी आज आपण सर्व महाराष्ट्रातील मराठी एकत्र आलात. यापुढचे राजकारण हे जातींमध्ये विभागायला सुरुवात करतील. जातीचे कार्ड खेळतील. मराठी म्हणून तुम्हाला एकत्र येऊ देणार नाहीत. हे जातीपातीत विभागायला सुरुवात करतीत, असा इशाराही त्यांनी दिला.

शिवतीर्थ ओसंडून वाहिले असते
वरळी एनएससीआय डोममध्ये हजारो मराठीप्रेमी आल्याने डोम अक्षरशः तुडुंब भरला. वाढत्या गर्दीमुळे पोलिसांनी डोममध्ये होणारे प्रवेश थांबवले. यामुळे हजारो मराठीप्रेमींनी डोमबाहेरील एलईडी स्क्रिनवर मेळावा पाहिला. ही गर्दी पाहून शिवतीर्थावर मेळावा व्हायला हवा होता, असे राज ठाकरे म्हणाले. शिवतीर्थही ओसंडून गेले असते, असेही ते म्हणाले. मात्र पावसाळा असल्याने शिवतीर्थावर मेळावा होऊ शकला नसल्याचे त्यांनी सांगितले.

ऐकून घेईन, पण ऐकणार नाही
राज्य सरकारने कुणालाही विश्वासात न घेता हिंदी सक्तीचा निर्णय जाहीर केल्यामुळे सक्तीला विरोध करीत सरकारसोबत दोन वेळा पत्रव्यवहार केला. मात्र कोणताही प्रतिसाद देण्यात आला नाही. त्यामुळेच आंदोलनाचा इशारा देण्यात आला. त्यामुळे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आपल्याला भेटून आपली बाजू ऐकून घेण्याची विनंती केली. मात्र ऐकून घेईन, पण ऐकणार नाही, असे भुसे यांना सांगितल्याचे राज ठाकरे म्हणाले. हिंदी सक्ती करण्याचा निर्णय अनाठायी होता असेही त्यांनी सांगितले. हिंदी सक्ती कशासाठी आणि कुणासाठी, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

कुणाची माय व्यायली आहे… मुंबई, महाराष्ट्राला हात घालून दाखवावा!
मुंबई स्वतंत्र करता येते का हे पाहण्यासाठीच सत्ताधाऱ्यांनी आधी मराठी भाषेला डिवचून पाहिले. हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र शांत राहिला तर पुढचे पाऊल टाकू असा त्यांचा डाव होता. मात्र कुणाची माय व्यायली आहे त्याने मुंबई, महाराष्ट्राला हात घालून दाखवावा. आम्ही शांत आहोत म्हणजे आम्ही गांडू नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.

फटकारे

मुंबई स्वतंत्र करता येते का, हे पाहण्यासाठीच सत्ताधाऱ्यांनी मराठी भाषेला डिवचून हिंदी सक्ती लादण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र शांत राहिला तर पुढचे पाऊल टाकू असा यांचा डाव होता!

लक्षात ठेवा तुमच्याकडे सत्ता असेल ती विधानसभेत, पण आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर. माझ्या मराठीकडे, महाराष्ट्राकडे कुणी वेड्यावाकड्या नजरेने पाहायचे नाही!

उठसूट कोणाला मारण्याची गरज नाही. पण इथं राहून जास्तीचा माज कुणी दाखवला तर कानाखाली जाळ काढायचा. मराठीचा स्वाभिमान राखलाच पाहिजे.

बाळासाहेब इंग्रजी पेपरमध्ये व्यंगचित्र काढायचे. मात्र त्यांनी कधी मराठी अभिमानात कोणतीही तडजोड केली नाही. असे असताना आपण त्यांच्या मराठी प्रेमाबद्दल शंका घेणार का!

Comments are closed.