उत्तराखंडच्या हत्येमागे कोणताही जातीय हेतू नाही.

वृत्तसंस्था / देहराडून (उत्तराखंड)

त्रिपुरातील एका युवकाची हत्या उत्तराखंडमध्ये झाल्यामुळे राजकीय वातावरण बरेच तापले आहे. तथापि, ही हत्या वांशिक कारणासाठी झाली नसून ती अन्य कारणांसाठी झाली आहे, असे प्रतिपादन उत्तराखंड पोलिसांनी केले आहे. हत्येत मारल्या गेलेल्या युवकाचे नाव अँजेल चकमा असे आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. आतापर्यंतच्या तपासातून कोणतेही वांशिक कारण समोर आलेले नाही, अशी माहिती पोलीस प्रवक्त्यांनी दिली आहे.

या हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उत्तराखंड पोलिसांनी विशेष दलाची स्थापना केली आहे. हे दल या हत्येचे सविस्तर आणि सखोल चौकशी करेल. तथापि, हत्या झालेल्या युवकाचे पिता मायकेल चकमा यांनी ही हत्या वांशिक कारणातून झाल्याचा आरोप केला होता. तो चुकीचा असल्याची माहिती उत्तराखंडचे एसएसपी अजय सिंग यांनी दिली. या हत्याप्रकरणात अटक केलेल्या पाच आरोपींपैकी एक मणिपूरचा, म्हणजे ईशान्य भारतातीलच आहे. हत्या झालेल्या युवकाच्या वंशासंबंधी आरोपींनी काही अभद्र टिप्पणी केली, अशी चर्चा होत आहे. तथापि, तसा प्रकार नाही. अटक केलेल्या पाच जणांपैकी एकाने अन्य काही कारणास्तव काही टिप्पणी केली होती. तथापि, ती आपल्याला उद्देशूनच केली आहे, असा अँजेल चकमा याचा गैरसमज झाला. त्यामुळे त्यांचे भांडण झाले. या वादावादीतून त्याची हत्या झाली, अशी माहिती एका आरोपीने दिल्याची बाब पोलिसांनी स्पष्ट केली आहे. मात्र, सर्व शक्यता गृहित धरुन चौकशी होत आहे.

Comments are closed.