उद्धव ठाकरेंना पाठिंबा देऊ नका, शिवसेना सोडा, असा दबाव माझ्यावर होता! संजय राऊत यांनी सगळंच सांगितलं

मी शिवसेना या पक्षामध्ये जन्मापासून आहे. या पक्षामध्ये मी आमदार, खासदार किंवा मंत्री होण्यासाठी आलो नाही, असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केले. तसेच उद्धव ठाकरेंना पाठिंबा देऊ नका, शिवसेना सोडा असा दबाव माझ्यावर होता असेही संजय राऊत म्हणाले.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, माझ्यामध्ये आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये कसले मतभेद असणार? तुम्ही ज्या प्रकारच्या बातम्या छापताय, कोणीतरी माझ्याशी किंवा आदित्य ठाकरे यांच्याशी साधा फोन करून विचारलं का? मुळात जी बैठक झाली असं सांगितलं जातं, त्या बैठकीला मी उपस्थित नव्हतो. मी दिल्लीमध्ये माझ्या पुस्तकाच्या कार्यक्रमाला होतो. मी शिवसेना या पक्षामध्ये जन्मापासून आहे. या पक्षामध्ये मी आमदार, खासदार किंवा मंत्री होण्यासाठी आलो नाही. मी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तो विचार पोहोचवण्यासाठी आलो आहे. मी स्वतःला एक सामान्य शिवसैनिक मानतो. बाळासाहेबांनी मला पक्षाचा नेता केलं, अनेक वर्ष खासदार केलं, तरीही मी स्वतःला शिवसैनिकच मानतो. माझा दोष इतकाच आहे की मी माझी मतं परखडपणे मांडतो आणि हे मी बाळासाहेबांकडून शिकलो आहे. माझं या पक्षातलं अस्तित्व आमदार, खासदार किंवा मंत्री होण्यासाठी नाही. माणसाने कधीतरी पदाचा निरोप घ्यायची मानसिक तयारी ठेवली पाहिजे. आम्हाला वाटतं की उद्धव ठाकरे अजून 15 वर्ष मुख्यमंत्री राहायला हवे होते. पण दुर्दैवाने त्यांना कमी काळ मिळाला. नियतीच्या मनात काय आहे, हे कोणी सांगू शकत नाही.

आम्ही खासदार आहोत की आमदार, हे विसरून पक्षावर आलेलं फोडाफोडीचं संकट थांबवणं, मजबूत संघटना उभी करणं आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात जनतेसमोर जाऊन या सरकारविरुद्ध संघर्ष करणं—ही आमची प्राथमिकता आहे. आमची भूमिका अशी आहे की पुन्हा एकदा शिवसेनेच्या हातात सत्ता यावी आणि उद्धव ठाकरे यांनी नेतृत्व करावं असेही संजय राऊत म्हणाले.

मी बाळासाहेबांनी निर्माण केलेल्या पक्षातच आहे आणि राहणार आहे. राज्यसभा किंवा लोकसभा खासदार होणं हे माझ्या जीवनाचं ध्येय कधीच नव्हतं, नाही आणि राहणारही नाही. आदित्य ठाकरे सतत दौरे करत आहेत—मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, संभाजीनगर—पण एखाद्याला टार्गेट करायचं ठरवलं तर मीडिया माध्यमातून काहीही केलं जातं.

धनखड यांचा कोणताही गैरव्यवहार नव्हता. त्यांना धमकावण्यात आलं. त्यांनी स्वतःचं घर विकलं आणि मुलीला कायदेशीर मार्गाने पैसे पाठवले. पण एखाद्याला अडकवायचं ठरवलं तर खोटे केस, खोटे गुन्हे दाखल करून फाईल तयार केली जाते—जशी माझी, अनिल देशमुख, नवाब मलिक, केजरीवाल, मनीष सिसोदिया, संजय सिंग, हेमंत सोरेन यांची केली. आम्ही या दबावापुढे झुकलो नाही. माझ्यावर शिवसेना सोडण्याचा दबाव होता. त्या संदर्भात मी व्यंकय्या नायडूंना पत्र लिहिलं. मला सांगितलं गेलं की उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देऊ नका. आम्ही त्यांना हटवू, तुम्ही मध्ये पडू नका. सर्वात आधी तुम्ही शिवसेना सोडा—असा दबाव होता.

मी स्पष्ट सांगितलं—कितीही दबाव आणला तरी मी पक्ष सोडणार नाही. जर मी पक्ष सोडला असता तर तुरुंगवास टळला असता—हे त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं. ईडीच्या कार्यालयातही मला सांगितलं गेलं होतं. शिवसेनेसाठी, या पक्षासाठी आम्ही घाम, रक्त आणि तुरुंगवास हे सर्व काही सहन केलं आहे असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

Comments are closed.