ते स्वत: ला राजे मानतात!

हिंदूंबद्दल अश्लील टिप्पणी करणाऱ्या मंत्र्याला न्यायालयाची फटकार

वृत्तसंस्था/ चेन्नई

द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे माजी मंत्री के. पोनमुडी यांच्या अश्लील भाषणावरून मद्रास उच्च न्यायालयाने फटकारले आहे. पोनमुडी यांनी हिंदू धार्मिक ओळखीला अत्यंत आक्षेपार्ह स्थितीशी जोडले होते. याप्रकरणी पोलीस योग्य कारवाई करू न शकल्यास सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात येतील असे न्यायालयाने मंगळवारी म्हटले आहे. न्यायालयाने या प्रकरणाची स्वत:हून दखल घेतली. सद्यकाळात नेत्यांना राज्यघटनेच्या अनुच्छेद 19 अंतर्गत अमर्याद सूट मिळाल्याचे वाटतेय. अशाप्रकारचे नेते स्वत:ला राजा समजू लागले आहेत. अशाप्रकरणांमध्ये मूकदर्शक राहता येणार नाही. आमच्या देशात विविध समुदायाचे लोक राहतात असे न्यायालयाने म्हटले आहे.

राजकीय नेत्यांनी भाषण देताना हा देश आम्हा सर्वांचा आहे हे ध्यानात ठेवावे. हा देश कुठल्याही एका व्यक्तीचा किंवा कुठल्याही पक्षाचा नाही. आम्ही अनेक धर्म आणि संस्कृतींना मानणारया लोकांदरम्यान राहतो हे सर्वांना ठाऊक असायला हवे. सर्व जण माइक हातात घेतात आणि आपण जणू राजा आहोत असे बोलून जातात. राजाच्या विरोधात कुणीच काही करू शकत नाही असे त्यांना वाटते. परंतु  हे सर्व पाहून न्यायालय मूकदर्शक राहू शकत नसल्याचे न्यायाधीश वेलमुरुगन यांनी म्हटले आहे.

पोनमुडी यांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या भाषणावर चहुबाजूने टीका झाल्यावर पोनमुडी यांनी माफी मागितली होती. पोनमुडी हे द्रमुकचे वरिष्ठ नेते असून मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

 

Comments are closed.