तिसरे अपत्य; अपक्ष नगरसेवकाचे पद धोक्यात

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

तिसऱ्या अपत्यामुळे नवी मुंबई महापालिकेचे १४ गावातील अपक्ष नगरसेवक भरत भोईर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांच्या निवडीविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर बेलापूर दिवाणी न्यायालयात सुनावणी सुरू असताना न्यायाधीश के. एन. फटांगरे यांनी भोईर यांना पुढील सुनावणीपर्यंत कोणत्याही धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेऊ नये असे आदेश दिले आहेत.

भरत भोईर हे प्रभाग क्रमांक १४ड मधून अपक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. तुर्भे येथील सविता लगाडे यांनी दाखल केलेल्या निवडणूक याचिकेत दोन अपत्य नियमाचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. भोईर यांचे तिसरे अपत्य १७ फेब्रुवारी २००२ रोजी जन्मले आहे. त्यांच्या अपत्याचा जन्म १२ सप्टेंबर २००१ नंतरचा असल्याने ते अपात्र ठरतात असा दावा करण्यात आला. याचिकाकर्त्यांनी रुग्णालयीन नोंदी, जन्मनोंदणी रजिस्टर तसेच पालिकेचे अभिलेख न्यायालयात सादर केले आहेत.

Comments are closed.