कबड्डी वर्ल्ड कप की धरून पकडून कप
>> मंगेश वरवडेकर
म्हणतात ना, प्रो कबड्डीमुळे कबड्डीची क्रांती झाली! हो रे! पण ती क्रांती कदाचित पुरुषांच्या अंगणातच झाली असावी, असं दिसतंय. महिलांच्या अंगणात मात्र अजूनही तोच संघर्ष भोगावा लागतोय.
बरोबर आठवतंय, 13 वर्षांपूर्वी पहिला महिला वर्ल्ड कप हिंदुस्थानात झाला होता. बिहारच्या राजगीर शहरात खेळवला गेला. या वर्ल्ड कपमध्ये आपल्या मुलींनी इराणला पाडून ‘जगज्जेतेपद’ हा चार अंगठय़ाच्या आकाराचा शब्द आपल्या कपाळी लावला. मग पुढे काही घडलंच नाही. दुसरा वर्ल्ड कप आता होईल… नंतर होईल म्हणता म्हणता 13 वर्षे निघून गेली. दुसरा कधी? हा प्रश्न कायम होताच. महिला वर्ल्ड कपची ही प्रगती पाहून ते एखादं सरकारी प्रकल्प असल्यासारखं वाटू लागलं होतं. उद्घाटन धडाक्यात, पण पुढे शांतता!
तरीही या वर्षी पुन्हा दुसऱ्या वर्ल्ड कपचा विषय आला. स्पर्धेचं ठरलंसुद्धा. आधी बिहारला खेळविला जाणार होता. मग हैदराबादचे नाव आले. तारखा ठरल्या, संघ ठरले. तेव्हा आयोजक हातात कपडे घेऊन म्हणाले, ‘अहो, आमच्याकडे जागा नाही! बांगलादेशात घ्या. या देशाने आपल्या देशात खेळाला पोषक असे वातावरण असल्याचे दाखवण्यासाठी आयोजनाची जबाबदारी घेतली. ते तयारीलाही लागले. आधी 14 संघांचा गजर झाला, पण उद्घाटनाच्या वेळी फक्त 11 जण हजर. स्थानिक कबड्डी स्पर्धेत जसं संघांना बोलवायला पुकार देतात, तसा पुकार द्यायचं बाकी होतं. ठरल्याप्रमाणे तीन संघ आलेच नाहीत. का नाही आले? कोणीही सांगितलं नाही. कदाचित व्हिसाऐवजी ते एअरपोर्टवर भलतंच घेऊन गेले असावेत. असो.
आणखी एक गंमत. जे संघ 13 वर्षांपूर्वी खेळले होते, कॅनडा, अमेरिका, मेक्सिको, श्रीलंका, इंडोनेशिया, जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, इटली, तुर्पमेनिस्तान. हे सगळे संघ कुठे गेले?
उद्यानात फिरायला गेलेत की काय? किमान हे संघ पुन्हा वर्ल्ड कपला दिसायला हवे होते, पण तसे झाले नाही. गेल्या 13 वर्षांत त्या देशांमध्ये कबड्डीचा ‘क’ ही खेळला गेला नसल्याचे कळले आहे. यात किती तथ्य आहे, हा संशोधनाचा विषय ठरू शकतो. यंदा त्यांची जागा घेतलीय झांझीबार, केनिया, युगांडा या आफ्रिकन संघांनी. आता हे संघ कधीपासून कबड्डी खेळ शिकताहेत? कुणाला माहीत नाही. कदाचित गुगल मॅपवर ‘कबड्डी मैदान’ शोधताना ते सापडले असतील.
वर्ल्ड कपमध्ये 11 संघांपैकी 6 आशियातील संघ आहेत. बाकी जे आहेत त्यांचा खेळ पाहून वाटतं, त्यांना एक महिना आधी सांगितलं असावं, ए बाबा, हा एक कबड्डी नावाचा खेळ आहे. ‘यूटय़ूब’वर बघा आणि तयारीला लागा. त्यांची ‘रेड’ म्हणजे ‘टॅक्सी काॅल’ आणि त्यांचा ‘टॅकल’ म्हणजे ‘खांद्यावर हात ठेवून फोटो काढा’ पोझ! सारे काही कल्पनाशक्तीच्या पुढे आहे.
आपले कबड्डी संघटक म्हणतात, कबड्डीला ऑलिम्पिकवारी घडवायचीय. चांगली इच्छा आहे. पण त्यासाठी संघ कसे वाढवायचे? त्यावर बहुधा भन्नाट उपाय शोधला असावा. जसे स्थानिक संघटना मतदानासाठी कागदावर बोगस संघ तयार करतात. तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर संघ आणि संघटना तयार कसे करायचे, असा मंत्र त्यांना दिला गेला असावा. हे पाहून जगात कबड्डीची प्रचंड प्रगती झालीय, अशी भीती वाटू लागलीय. या स्पर्धेने कबड्डीचे हित साधले जाणार आहे का. हा खरोखर वर्ल्ड कप आहे का… की धरून पकडून आणलेले संघ मैदानात उतरवले गेलेत. ही स्पर्धा इतकी अटीतटीची सुरू आहे की ‘अंतिम सामना कोणाचा? या प्रश्नाचे पाठीमागून कुणीतरी हळूच उत्तर देतो, हिंदुस्थान-इराण. आणि हे सांगायला पुणालाही भविष्य बघावे लागत नाही.
महिला कबड्डीची जागतिक पातळीवरील ही अवस्था बघून पुन्हा भीती वाटू लागलीय. पुरुषांच्या अंगणात दिवे लागलेत, कॅमेरे लागलेत, जाहिराती येतायत, लाखोंची बेटिंग चालू आहे. महिलांच्या या वर्ल्ड कपला प्रेक्षकांची अनुपस्थिती जाणवतेय. कृपा करा, खेळ बघायला या, असे आयोजकांना सांगावे लागतेय. आता तरी कबड्डीच्या प्रो संघटकांनी अंजन डोळय़ात घालायला हवे. नाहीतर जगाला कळेल, आपण कबड्डी ‘खेळतो’ पण प्रगती ‘कागदावर’ करतो. महिला वर्ल्ड कप त्याचे जिवंत उदाहरण आहे.
Comments are closed.