छत्तीसगडमध्ये मारल्या गेलेल्या तीस नक्षलवादी
महत्वाचे नेते बसव राजू यांच्याही मृतांमध्ये समावेश
वृत्तसंस्था /नारायणपूर
महत्वाचे माओवादी नेते बसव राजू यांच्यासह 30 नक्षलवाद्यांना छत्तीसगडमध्ये कंठस्नान घालण्यात आले आहे. बसव राजूही या चकमकीत ठार झाल्याने या राज्यातील माओवादी आणि नक्षलवादी चळवळीला मोठा धक्का बसला आहे. या राज्याच्या नारायणपूर जिल्ह्यातील अबुझमाद येथील वनप्रदेशात बुधवारी ही चकमक झाली. बसव राजू यांच्यावर दीड कोटी रुपयांचे पारितोषिक होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या मोठ्या कारवाईसाठी छत्तीसगड पोलीस आणि अर्धसैनिक दलांचे अभिनंदन केले आहे. 2026 पर्यंत छत्तीसगड माओवाद आणि नक्षलवादापासून मुक्त होईल, असा विश्वास अमित शहा यांनी या कारवाईनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला आहे.
नक्षलवाद्यांच्या विरोधात ही कारवाई नारायणपूर, दंतेवाडा, बीजापूर आणि कोंडागाव या चार जिल्ह्यांमधील जिल्हा राखीव दलांनी संयुक्तरित्या केली आहे. या दलांच्या सैनिकांवर, ते टेहळणी करत असताना अबुझमाद येथील वनक्षेत्रात नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यामुळे प्रत्युत्तरासाठी सैनिकांनीही नक्षलवाद्यांवर गोळीबार केला. त्यानंतर सैनिकांच्या विविध तुकड्यांनी वनक्षेत्राला वेढा घालून आत असलेल्या नक्षलवाद्यांची कोंडी केली. सैनिकांनी त्यांना शरण येण्याचे आवाहन केले. तथापि, नक्षलाRनी गोळीबार केल्याने त्यांना कंठस्नान घातले गेले, अशी माहिती या कारवाईनंतर बस्तर विभागाचे पोलीस अधिक्षक सुंदरराज पी. यांनी पत्रकारांना दिली. सातत्यपूर्ण कारवाईमुळे बस्तर भागातील नक्षलवाद्यांचा जोर बराच कमी झाला असून संख्याबळही घटले आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
अबुझमाद हा दुर्गम भाग
ज्या अबुझमाद वनक्षेत्रात ही चकमक झाली, तो अत्यंत दुर्गम म्हणून ओळखला जातो. या भागात भूमापनही करता येत नाही अशी स्थिती असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हा भाग क्षेत्रफळाच्या दृष्टीने साधारणत: गोव्याइतका आहे. या संपूर्ण भागात घनदाट वने आहेत. त्यामुळे नक्षलींच्या कारवाया या वनाच्या आवरणाखाली चालत असतात, अशी माहितीही देण्यात आली आहे.
गुप्तचरांच्या माहितीवरुन कृती
अनेक वर्षांपासून पोलिसांना हवे असलेले माओवाद्यांचे म्होरके बसव राजू हे अबुझमाद या भागात दडलेले आहेत, अशी माहिती गुप्तचरांनी जिल्हा राखीव पोलीस दलाला पुरविली होती. त्यामुळे त्यांना पकडणे हा या कारवाईचा उद्देश होता. मात्र, बसव राजू यांच्यासमवेत असलेल्या नक्षलावाद्यांनी सुरक्षा सैनिकांना शरण येण्याऐवजी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यामुळे सुरक्षा सैनिकांना स्वसंरक्षणार्थ गोळीबार करावा लागला. या गोळीबारात बसव राजू यांचाही मृत्यू झाला.
बंदी घातलेली संघटना
बुधवारच्या कारवाईत ठार झालेले सर्व नक्षलवादी हे बंदी घालण्यात आलेल्या माओईस्ट लेनिनिस्ट संघटनेचे होते, अशीही माहिती उपलब्ध झाली आहे. ही संघटना या भागात गेल्या 30 वर्षांपासून कार्यरत आहे. या भागातल्या अनेक हिंसाचारी कृत्यांमध्ये या संघटनेचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दुसरी मोठी कारवाई
एक महिन्याभरापेक्षा कमी वेळात बस्तर भागात घडलेली ही दुसरी मोठी चकमक आहे. मागच्या महिन्यात झालेली चकमक साधारणत: 18 दिवस चाललेली होती. त्या कारवाईला ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट असे नाव देण्यात आले होते. त्या चकमकीत नक्षलवाद्यांच्या ‘बटालीयन वन’ या सशस्त्र शाखेचा मोठा नाश झालेला होता. लवकरात लवकर नक्षलवाद या भागातून संपविण्याचा केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा विचार असून त्यादृष्टीने कारवाई करण्यात येत आहे.
बसव राजू कोण…
बसव राजू हा शिक्षणाने इंजिनिअर पदवीधर होता. तो मूळचा तेलंगणातील वारंगळ येथील होता. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने माओवादाचा हिंसाचारीं मार्ग स्वीकारला. त्याने बस्तर भागात माओवाद्यांच्या सशस्त्र हस्तकांचे जाळे निर्माण केले आहे. चिंतलनार येथे एका मोठ्या हल्ल्यात त्याच्या माओवादी लेनिनवादी संघटनेने केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या 76 सैनिकांची हत्या केली होती. या हत्याकांडानंतर तो प्रकाशात आला. तसेच 2018 मध्ये याच बस्तर भागात काँग्रेस नेत्यांच्या एका गटावर हल्ला करण्यात आला होता. त्या हल्ल्यात काँग्रेसचे 25 नेते मृत्यूमुखी पडले होते. छत्तीसगडमधील काँग्रेसचे जवळपास सर्व महत्वाचे नेते त्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले होते. तो हल्ला बसव राजू याच्याच पुढाकाराने करण्यात आला होता. त्यानंतर त्याला पकडून देणाऱ्यास दीड कोटी रुपयांचे इनाम घोषित करण्यात आले होते. अशा कुप्रसिद्ध माओवादी म्होरक्याचा अंत बुधवारच्या चकमकीत झाला असून त्यामुळे माओवादी दुर्बळ होण्याची शक्यता आहे.
धारदार कार्यवाही
ड 2026 पर्यंत छत्तीसगडमधून माओवाद संपविण्याचा सरकारचा निर्धार
ड बसव राजूच्या मृत्यूमुळे बस्तर भागात माओवाद्यांना बसला मोठा हादरा
ड गेल्या सहा महिन्यांमध्ये छत्तीसगडच्या वनक्षेत्रात अनेकदा धडक कारवाई
Comments are closed.