पंजाब किंग्ससाठी 18 कोटींचा हा खेळाडू ठरला डोकेदुखी; 4 सामन्यांत घेऊ शकलाय फक्त 2 विकेट्स
आयपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्सचा संघ आतापर्यंत एकही सामना हरलेला नाही. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली या संघाने आतापर्यंत तीन सामने खेळले आहेत, ज्यापैकी दोन सामन्यांत त्यांना विजय मिळाला आहे, तर एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. या हंगामात पंजाबची कामगिरी जरी शानदार असली, तरी एका खेळाडूच्या खराब फॉर्मने संघाची चिंता वाढवली आहे. तो खेळाडू दुसरा कोणी नसून संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आहे, ज्याला पंजाबने १८ कोटी रुपये देऊन रिटेन केले होते. मात्र, या हंगामात अर्शदीप अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलेला नाही.
अर्शदीप सिंगबद्दल बोलायचे झाले तर, या आयपीएल हंगामात तो आतापर्यंत केवळ दोन विकेट्स घेण्यात यशस्वी झाला आहे आणि तो खूप महागडा देखील ठरला आहे. त्याने या दोन्ही विकेट्स सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात घेतल्या आहेत, परंतु या सामन्यातही त्याने प्रचंड धावा दिल्या. SRH विरुद्धच्या सामन्यात त्याने आपल्या चार षटकांत ५० धावा लुटवल्या. यापूर्वी अर्शदीपने केकेआरविरुद्ध दोन षटकांत १६ धावा, सीएसकेविरुद्ध चार षटकांत ४१ धावा आणि गुजरातविरुद्ध चार षटकांत ४२ धावा दिल्या होत्या. परंतु, यापैकी एकाही सामन्यात त्याला विकेट मिळाली नव्हती. अशा परिस्थितीत अर्शदीपला विकेट्स न मिळणे ही पंजाबसाठी सर्वात मोठी चिंतेची बाब आहे.
सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात अर्शदीप सिंगने पंजाब किंग्ससाठी गोलंदाजीची सुरुवात केली. त्याने पॉवरप्लेमध्ये २ षटके टाकली आणि ३३ धावा दिल्या. या दरम्यान त्याने सहा वाईड बॉल फेकले. अभिषेक शर्माने त्याच्याविरुद्ध तीन चौकार आणि दोन षटकार ठोकले. अर्शदीपने तिसऱ्या षटकात २४ धावा दिल्या, ज्यापैकी चार धावा वाईडमुळे आल्या. त्याने सलग तीन वाईड बॉल टाकले. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यापर्यंत, अर्शदीप सिंगने ४ सामन्यांतील पॉवरप्लेमध्ये ७२ चेंडू फेकून १३२ धावा दिल्या आहेत. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट ११ चा आहे. दरम्यान, त्याने याच सामन्याच्या शेवटच्या दोन षटकांत दोन विकेट्स आपल्या नावावर केल्या.
विशेष म्हणजे, गेल्या १० आयपीएल सामन्यांमध्ये अर्शदीप सिंगने पॉवरप्लेमध्ये एकूण २० षटके टाकली आहेत. यादरम्यान त्याने १०.८ च्या इकॉनॉमी रेटने २१६ धावा खर्च केल्या आहेत. यात सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या काळात त्याला एकही विकेट घेता आलेली नाही, जे संघासाठी चिंतेचे कारण आहे. अर्शदीप सिंग हा नवीन चेंडूने विकेट घेण्यसाठी ओळखला जातो. मात्र, गेल्या काही आयपीएल सामन्यांत तो तसे करण्यात अपयशी ठरला आहे. अर्शदीपला आता येणाऱ्या सामन्यांमध्ये नवीन चेंडूसह चांगली कामगिरी करावी लागेल.
Comments are closed.