T-20WC2026: ऑस्ट्रेलियाच्या पराभवाने पाँटिंग निराश; विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर सांगितली संघातील मोठी कमतरता

माजी कर्णधार रिकी पाँटिंगने (former cricketer of Australia Ricky ponting) टी-20 वर्ल्ड कप 2026 मधून ऑस्ट्रेलियाच्या लवकर बाहेर पडण्याला ‘अत्यंत खराब मोहीम’ (Bad Campaign) म्हटले आहे. त्याच्या मते, या संघात जुन्या ऑस्ट्रेलियन संघांसारखी जरब किंवा ‘प्रभावी वलय’ (Aura) नव्हते.

आयसीसी रिव्ह्यूमध्ये बोलताना पाँटिंग म्हणाले, मैदानावर या संघात ती ताकद दिसत नव्हती, जी पूर्वीच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियन संघांमध्ये असायची. वर्ल्ड कप जिंकण्यासाठी संघातील सर्वात अनुभवी आणि सर्वोत्तम खेळाडूंनी महत्त्वाच्या क्षणी चांगली कामगिरी करणे गरजेचे असते, मात्र ऑस्ट्रेलियाकडे त्याची कमतरता दिसली. पाँटिंगने टॉप ऑर्डरवर ताशेरे ओढले. कॅमेरून ग्रीन (क्रमांक 3) आणि टिम डेव्हिड (क्रमांक 4) अपेक्षित कामगिरी करू शकले नाहीत. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात तर ऑस्ट्रेलियाने शेवटच्या षटकांत अवघ्या 20 धावांत 6 विकेट्स गमावल्या होत्या.

झिम्बाब्वेविरुद्धच्या 23 धावांच्या अनपेक्षित पराभवामुळे ऑस्ट्रेलिया ‘सुपर 8’ साठी पात्र ठरू शकला नाही. पाँटिंगच्या मते, याच पराभवामुळे ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कपमधील प्रवास संपला. तो म्हणाला, झिम्बाब्वेविरुद्धचा पराभव त्यांना कायम बोचत राहील, कारण तिथेच सर्व काही संपले होते.

स्पर्धेच्या सुरुवातीलाच जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स दुखापतीमुळे बाहेर होते, तर टिम डेव्हिड सुरुवातीला उपलब्ध नव्हता. पाँटिंगने मान्य केले की, श्रीलंकेला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवणे कठीण होते. श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ज्या पद्धतीने धावांचा पाठलाग (Run Chase) केला, त्याचे त्याने कौतुक केले.

पाँटिंगने हे स्पष्ट केले की, ऑस्ट्रेलिया टी-20 वर्ल्ड कपला कमी महत्त्व देते हा समज चुकीचा आहे. आयसीसीचे जेतेपद जिंकणे हेच संघाचे मुख्य उद्दिष्ट असते. आम्ही माजी खेळाडू म्हणून सध्याच्या खेळाडूंवर विनाकारण टीका करत नाही किंवा त्यांच्याबद्दल नकारात्मक बोलत नाही. आम्हाला आमचा संघ जिंकताना पाहायचा आहे. दुर्दैवाने, गेल्या काही आठवड्यात तसे घडले नाही आणि या अपयशासह आता या खेळाडूंना जगावे लागेल., असेही ते म्हणाले.

Comments are closed.