हे फळ साबणापेक्षा अधिक प्रभावी आहे

रिठा’ हे फळ आज अनेकांना केवळ ऐकून माहीत आहे. पूर्वीच्या काळी रिठ्याची झाडे पुष्कळ प्रमाणात दिसून येत असत. या रिठ्याचे चूर्ण किंवा गर पाण्यात टाकल्यास त्याचा साबणाप्रमाणे फेस होत असे आणि त्या फेसात भांडी किंवा कपडे चांगल्यापैकी धुवून काढता येत असत. तथापि, कालांतराने विविध प्रकारांची आधुनिक साबणे आणि त्यानंतर डिटर्जंट उपलब्ध झाले. ते उपयोग करण्यास सोपे आणि अधिक प्रभावी असल्याने रिठा हे फळ मागे पडले.

तथापि, राजस्थानातील छतरपूर जिल्ह्यात अनेक गावांमध्ये आजही एका ‘स्वच्छता फळा’चा उपयोग केला जातो. याला इंगुदा किंवा हिंगोट या नावाने ओळखले जाते. या फळाच्या चूर्णाचा उपयोग आजही सर्रास कपडे किंवा भांडी धुण्यासाठी केला जातो हे फळ आधुनिक साबणापेक्षाही प्रभावी आहे, असे या गावकऱ्यांचे म्हणणे आहे. हे फळ स्थानिक पातळीवर उपलब्ध असल्याने ते साबणापेक्षा स्वस्तही आहे. याची झाडे अनेकांच्या घरात आहेत. त्यामुळे त्यांना हा  ‘नैसर्गिक साबण’ जवळपास विनामूल्यच मिळतो. म्हणून बाजारात इतकी साबणे उपलब्ध असतानाही या भागातील लोक याच फळाचा उपयोग करताना दिसतात.

विशेषत: सुती कपड्यांसाठी हे फळ अधिक उपयुक्त आहे. रिठ्याप्रमाणे बायका याचा उपयोग केस धुण्यासाठी किंवा आंघोळीसाठीही करतात. कित्येकांना साबणाची अॅलर्जी असते. त्यांच्यासाठी या फळाचे चूर्ण किंवा पेस्ट उपयोगी पडते. अलिकडच्या काळात या फळाची लोकप्रियता शहरी भागातही वाढू लागली आहे. शहरातील अनैसर्गिक आणि कृत्रिम वातावरणाला कंटाळलेले बरेच लोक अलिकडच्या काळात नैसर्गिक जीवनशैलीकडे झुकू लागले आहेत. त्यामुळे या फळाची मागणी वाढू लागली आहे. या फळापासून स्वच्छता उत्पादने निर्माण करता येतील काय, याचीही चाचपणी चालली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Comments are closed.