भारतीय संघासाठी खेळला 'हा' पाकिस्तानी खेळाडू, आता मिळणार कठोर शिक्षा!

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकारण असो किंवा खेळाचे मैदान, येथील वातावरण नेहमीच तापलेले असते. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानचा स्टार आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू उबैदुल्लाह राजपूत सध्या एका मोठ्या वादात सापडला आहे. उबैदुल्लाहने (16 डिसेंबर) रोजी बहरीनमध्ये आयोजित एका खाजगी स्पर्धेत सहभाग घेतला होता, मात्र आश्चर्याची बाब म्हणजे त्याने या स्पर्धेत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व न करता भारताचे प्रतिनिधित्व केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून, त्यामध्ये तो भारतीय जर्सी घालून खेळताना दिसत आहे. या प्रकारामुळे पाकिस्तानमध्ये संतापाची लाट उसळली असून, आपल्या देशाऐवजी कट्टर प्रतिस्पर्धी देशाचे प्रतिनिधित्व केल्यामुळे आता उबैदुल्लाह राजपूतवर कडक कारवाई केली जाणार असल्याचे समजते.

बहरीनमध्ये आयोजित ‘जीसीसी कप’ (GCC Cup) मध्ये भारत, पाकिस्तान आणि इराण यांसारख्या देशांच्या नावावर संघ तयार करण्यात आले होते. या स्पर्धेत पाकिस्तानचा स्टार कबड्डीपटू उबैदुल्लाह याने भारताचे प्रतिनिधित्व केले. विशेष म्हणजे, त्याने भारताची जर्सी परिधान केली होती आणि तो भारताचा राष्ट्रीय ध्वज अभिमानाने फडकवताना देखील दिसला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे

आता पाकिस्तानी खेळाडू उबैदुल्लाह याच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणानंतर पाकिस्तान कबड्डी महासंघाचे (PKF) सचिव राणा सरवर यांनी घोषणा केली आहे की, (27 डिसेंबर) रोजी एक तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीमध्ये उबैदुल्लाहसह अशा 16 पाकिस्तानी कबड्डीपटूंवर निर्णय घेतला जाईल, जे बोर्डाची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता बहरीनमध्ये कबड्डी खेळण्यासाठी गेले होते.

‘स्पोर्टस्टार’च्या वृत्तानुसार, राणा सरवर यांनी सांगितले की, “मी या गोष्टीची पुष्टी करू शकतो की, हे एक खाजगी आयोजन होते, ज्यामध्ये आयोजकांनी भारत, पाकिस्तान, कॅनडा, इराण इत्यादी देशांच्या नावावर खाजगी संघ तयार केले होते. मात्र, सर्व संघांमध्ये त्या-त्या देशांचे मूळ खेळाडू सहभागी झाले होते. भारतीय खेळाडूंनी भारतीय खाजगी संघाचे प्रतिनिधित्व केले, पण उबैदुल्लाह त्यांच्याकडून खेळला, जे या परिस्थितीत पूर्णपणे अस्वीकार्य आहे. त्यामुळे, पाकिस्तानच्या नावाने बनावट पद्धतीने खेळणाऱ्या या खेळाडूंविरुद्धही कठोर कारवाई केली जाईल.”

Comments are closed.