IPL 2026 मधून आधीच बाहेर, पण आता ‘या’ फ्रेंचाइजीने स्टार खेळाडूसोबत केला 2 वर्षांसाठी करार

ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) 27 जानेवारी रोजी ‘मेलबर्न स्टार्स’ या फ्रँचायझीसोबत आणखी दोन वर्षांचा करार केला आहे. विशेष म्हणजे, बिग बॅश लीगचा (BBL) ‘कॉन्ट्रॅक्टिंग एम्बार्गो’ (करारावर बंदी येण्याचा काळ) सुरू होण्यापूर्वीच त्याने ही स्वाक्षरी केली. दरम्यान, मॅक्सवेल आयपीएल 2026 च्या मिनी लिलावात नसल्यामुळे तो या हंगामात खेळताना दिसणार नाही.

एका अधिकृत निवेदनात मॅक्सवेलने आपला आनंद व्यक्त करताना सांगितले की, मेलबर्न स्टार्स माझ्या क्रिकेट कारकिर्दीचा एक अविभाज्य भाग आहे. या संघाच्या यशासाठी मी मनापासून प्रयत्न करत आहे. मला खात्री आहे की आमचा सध्याचा संघ काहीतरी खास कामगिरी करण्याच्या मार्गावर आहे आणि पुढील दोन सीझनमध्ये आम्ही विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार असू.

मॅक्सवेल बिग बॅश लीगच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज आहे. नवीन करारानुसार, मॅक्सवेल वयाच्या 39 व्या वर्षांनंतरही क्रिकेट खेळताना दिसेल. मेलबर्न स्टार्स हा एकमेव संघ आहे ज्याने अजूनही बीबीडीएलचे विजेतेपद मिळवलेले नाही. या हंगामात त्यांनी बाद फेरीपर्यंत धडक मारली होती, पण त्यांना पुढे जाता आले नाही. चालू हंगामात मॅक्सवेलला फॉर्मसाठी झगडावे लागले. त्याने 8 डावांत केवळ 76 धावा केल्या आणि फक्त 2 बळी घेतले. तरीही, स्टार्सने त्याच्यावर विश्वास कायम ठेवला आहे. त्याला ‘सिडनी थंडर’कडूनही संघात येण्याची ऑफर मिळाली होती, परंतु त्याने आपल्या जुन्या संघालाच पसंती दिली. मेलबर्न स्टार्सचे परफॉर्मन्स मॅनेजर क्लिंट मॅके यांनी मॅक्सवेलचे कौतुक करताना म्हटले की, ग्लेन हा जगातील सर्वोत्तम टी-20 खेळाडूंपैकी एक आहे. त्याचे संघाप्रती असलेले समर्पण आमच्यासाठी खूप मोलाचे आहे.

Comments are closed.