जे रोहिंग्यांना समर्थन देतात ते सुरक्षित नाहीत!

गृहमंत्री अमित शहा यांचे कडक निर्देश : खराब कामगिरी करणाऱ्या पोलिसांनाही इशारा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांना मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी दिले. हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई केली पाहिजे, असे शहा यांनी शुक्रवारी दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेताना स्पष्ट केले. या बैठकीला दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, गृहमंत्री आशिष सूद, दिल्ली पोलीस आयुक्त संजय अरोरा आणि इतर अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना देशात प्रवेश करण्यास त्यांची कागदपत्रे बनवण्यास आणि येथे राहण्यास मदत करणाऱ्या संपूर्ण नेटवर्कवर कठोर कारवाई केली पाहिजे, असे अमित शहा यांनी बैठकीमध्ये स्पष्ट केले. त्याव्यतिरिक्त सातत्याने खराब कामगिरी करणाऱ्या पोलीस स्टेशन आणि उपविभागांवरही कडक कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले. शहरातील आंतरराज्यीय गुन्हेगारी टोळ्यांचा नायनाट करणे ही दिल्ली पोलिसांची प्राथमिकता असली पाहिजे. ड्रग्जशी संबंधित प्रकरणांमध्ये वरपासून खालपर्यंत सर्वांवर कारवाई केली पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.