शिक्षणाच्या आयचा घो! धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो!! गर्दीचा बुलंद आवाज
‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’, ‘तरुणाईचा एकच नारा, भ्रष्टाचाराचा खेळ संपवा सारा’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा गगनभेदी घोषणांनी आज छत्रपती शिवाजी महाराज मैदान दणाणून गेले. ‘नीट’ पेपरफुटी आणि शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याविरोधातील आंदोलन चिरडण्याचे कारस्थान करणाऱया सरकारचा यावेळी धिक्कार करण्यात आला. शिक्षणाच्या ‘आयचा घो’… धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो’! असा बुलंद आवाज शिवसेनेच्या आंदोलनात घुमला.
भाजप सरकारच्या काळात ‘नीट’, ‘सीबीएसई’सारख्या परीक्षांमध्ये भ्रष्टाचाराने पेपरफुटी होत असल्यामुळे हजारो तरुणांचे भवितव्य अंधःकारमय झाले आहे. ‘नीट’ पेपरफुटीनंतर आतापर्यंत तब्बल 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. असे असताना भाजप सरकारकडून केवळ कारवाईचा फार्स केला जात आहे. याविरोधात दिल्लीच्या जंतरमंतरवर सामाजिक कार्यकर्ते-सोनम वांगचुक आणि क्रॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दाबके यांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला शिवसेनेने जाहीर पाठिंबा देत आज शिवतीर्थावर आंदोलनाची हाक दिली. या आंदोलनात मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवसैनिक, तरुण मोठय़ा संख्येने सहभागी झाली. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला.
Comments are closed.