इंडिगो विमान उडवण्याची धमकी
वृत्तसंस्था/कोलकाता
कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी शनिवारी सकाळी मिळाल्याने घबराट पसरली. विमान उड्डाण घेण्याच्या तयारीत असतानाच धमकीचे पत्र सापडल्यामुळे सुरक्षा प्रोटोकॉलनुसार तात्काळ कारवाई सुरू करण्यात आली. सर्व प्रवाशांना सुरक्षित ठेवत विमानाला सुरक्षा अधिकाऱ्यांच्या ताब्यात देत तपासणी करण्यात आली. इंडिगोचे विमान क्रमांक 6ई3074 सकाळी 9:15 वाजता कोलकाताहून शिलाँगला जाणार होते. प्रवासी विमानात बसल्यानंतर बोर्डिंग प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली होती.
याचदरम्यान, विमानाच्या शौचालयात क्रू मेंबर्सना हस्तलिखित कागदाचा तुकडा आढळला. सदर कागदावर विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याचे नमूद केले होते. क्रूने याबाबत ताबडतोब वैमानिक आणि विमानतळ अधिकाऱ्यांना माहिती दिली. विमानात बॉम्ब असल्याची बातमी मिळताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली. सुरक्षिततेच्या खबरदारीचे पालन करून, सर्व प्रवाशांना ताबडतोब सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. विमान मुख्य धावपट्टीवरून अन्यत्र हलवण्यात आले. त्यानंतर बॉम्बशोधक पथक आणि सुरक्षा यंत्रणांकडून सखोल शोधमोहीम राबविण्यात आली. मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही.
Comments are closed.