पश्चिम बंगाल बलात्कार प्रकरणात तीन अटक

अन्य दोघांचा शोध सुरू : पीडितेचा मित्रही ताब्यात : मोबाईल टॉवर लोकेशनवरून बलात्काऱ्यांचा शोध

वृत्तसंस्था/ कोलकाता

पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे वैद्यकीय विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. अन्य दोघेजण अजूनही फरार आहेत. सर्वजण जवळच्या गावातील रहिवासी असल्याची माहिती  पोलिसांनी दिली. आरोपी पीडितेचा मोबाईल फोन घेऊन फरार झाल्यानंतर मोबाईल टॉवर लोकेशनवरून आरोपींचा शोध घेण्यात आला. दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगाचे (एनसीडब्ल्यू) एक पथक रविवारी दुर्गापूरमध्ये दाखल झाले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालला बलात्कारी आणि गुन्हेगारांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनवल्याचा आरोप भाजप नेत्या आणि केंद्रीय मंत्री सुकांता मजुमदार यांनी केला.

दुर्गापूरच्या उपदंडाधिकारी आणि एसडीओ रंजना रॉय यांनी पीडितेची भेट घेत तपासाची चक्रे फिरवली होती. आरोपींना पीडितेच्या मोबाईल फोनमधील लोकेशनच्या आधारे ताब्यात घेतले गेले. त्यांनी मोबाईल फोन वापरून त्यांच्या मित्राला फोन केला. ज्या मोबाईल टॉवरला कॉल केला होता त्याचे लोकेशन ट्रॅक करण्यात आल्यामुळे अटक करण्यात आली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज मिळवले जात आहे. मेडिकल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी सुरू आहे. 11 ऑक्टोबर रोजी पीडितेच्या पालकांनी दुर्गापूर न्यू टाउनशिप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला, असे पोलिसांनी सांगितले.

कोलकातापासून 170 किमी अंतरावर असलेल्या दुर्गापूर येथील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात 10 ऑक्टोबर रोजी रात्री 8 ते 10 वाजण्याच्या दरम्यान बलात्काराची घटना घडली होती. पीडिता तिच्या मित्रासोबत जेवायला बाहेर गेली असता कॅम्पसच्या गेटवर काही तरुणांनी अडवून तिच्यावर अत्याचार केल्याचे उघड झाले होते. या घटनेनंतर तरुणांनी तिचा मोबाईल फोन हिसकावून घेतल्यानंतर तिला केसांना धरून कॅम्पसच्या गेटसमोरील जंगलात नेले होते. त्यानंतर तिघांनीही तिच्यावर बलात्कार केला. तिच्या मित्राने घटनास्थळावरून पळ काढला होता. पीडिता ओडिशाची रहिवासी असून ती सध्या एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. विद्यार्थिनीवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर आहे. सध्या तिचे कुटुंबीय तिच्यासोबत आहेत.

मुलींनी रात्री बाहेर फिरू नये : ममता बॅनर्जी

पश्चिम बंगाल पुन्हा एकदा बलात्काराच्या घटनेमुळे चर्चेत आले आहे. दुर्गापूरमध्ये 23 वर्षीय एमबीबीएस विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराने सर्वांना धक्का बसला आहे. दरम्यान, राज्याच्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या प्रकरणावर मौन सोडत कॉलेज व्यवस्थापनावरच प्रश्न उपस्थित केले आहेत. रात्रीच्या वेळी विद्यार्थिनी कशी कॅम्पसबाहेर पडली? अशी विचारणा करत मुलींनी रात्रीच्यावेळी बाहेर फिरू नये, असा सल्ला दिला आहे. खासगी महाविद्यालयांनीही त्यांच्या कॅम्पसभोवती कडक सुरक्षा लागू करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणात सहभागी कोणालाही सोडले जाणार नाही. राज्य सरकार अशा घटनांसाठी शून्य सहनशीलतेचे धोरण ठेवते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments are closed.