लँडमाइन स्फोटात तीन कमांडो शहीद

तेलंगणा-छत्तीसगड सीमेवर नक्षलवाद्यांकडून ‘घात’

वृत्तसंस्था/रायपूर

तेलंगणा-छत्तीसगड सीमेवर गुरुवारी सकाळी नक्षलवाद्यांनी बसवलेल्या भूसुरुंग स्फोटात नक्षलविरोधी विशेष दलाचे तीन कनिष्ठ कमांडो हुतात्मा झाले. नक्षलवादविरोधी पथकातील कमांडो मुलुगु जिल्ह्यातील पेरुर वनक्षेत्रात रेकी करत असताना ताडपाला टेकड्यांजवळ भूसुरुंग स्फोट झाला. या स्फोटात तीन सैनिकांना प्राण गमवावे लागले अशी माहिती तेलंगणा पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.  तेलंगणामध्ये या वर्षीच्या नक्षलवादविरोधी मोहिमेतील ही पहिलीच हौतात्म्याची घटना मानली जात आहे. तेलंगणा-छत्तीसगड सीमेवर नक्षलवादी कारवायांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गुरुवारी सकाळी झालेल्या भूसुरुंग स्फोटात नक्षलविरोधी विशेष दल

‘ग्रेहाउंड्स’चे तीन कनिष्ठ कमांडो हुतात्मा झाले. हे कमांडो नियमित क्षेत्र वर्चस्व सरावात गुंतलेले असताना नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंग स्फोटामध्ये त्यांचा ‘घात’ झाला. ही कारवाई केंद्रीय राखीव पोलीस दल किंवा इतर राज्य पोलिसांच्या कोणत्याही संयुक्त कारवाईचा भाग नव्हती. हा तेलंगणा पोलिसांचा एक स्वतंत्र गस्त सराव होता. पोलिसांनी हुतात्मा झालेल्या कमांडोंची अधिकृत ओळख जाहीर केलेली नाही. मारले गेलेले सर्व जवान कॉन्स्टेबल रँकचे ग्रेहाउंड कमांडो होते. ही घटना तेलंगणा पोलिस आणि राज्य गुप्तचर संस्थांसाठी माओवाद्यांच्या कारवायांबाबत गंभीर चिंतेचा विषय बनली आहे.

तेलंगणातील मुलुगु आणि भद्राद्री-कोठागुडेम जिल्हे छत्तीसगडच्या सीमेमुळे नक्षलवाद्यांनी ग्रस्त आहेत. गेल्या काही वर्षांत तेलंगणा पोलिसांच्या सशस्त्र मोहीम आणि आत्मसमर्पण धोरणांतर्गत 250 हून अधिक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यातील बहुतेक नक्षलवादी मूळचे छत्तीसगडचे रहिवासी आहेत. छत्तीसगडमधील विजापूर जिह्यात ‘ऑपरेशन संकल्प’ अंतर्गत सुरक्षा दलांनी केलेल्या चकमकीत 22 नक्षलवाद्यांना ठार केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा स्फोट झाला. विजापूर, मुलुगु आणि भद्राद्री-कोथागुडेमच्या आंतरराज्य सीमेवर असलेल्या करेगुट्टाच्या जंगल भागात ही घटना घडली. तेलंगणा पोलिसांनी ‘ऑपरेशन संकल्प’मध्ये औपचारिकपणे भाग घेतला नसला तरी, ते सीमावर्ती भागात नक्षवादी कारवायांवर सतत लक्ष ठेवून आहेत. या भागात अजूनही नक्षलवादी गट सक्रिय असून ते सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यास सक्षम असल्याचे दिसते.

Comments are closed.