बालमहोत्सव की हाल महोत्सव, हिवाळय़ाऐवजी रखरखत्या उन्हात मैदानी स्पर्धा घेतल्याने पालकांमधून संताप
महिला व बालविकास विभागातर्फे सोलापुरात उद्यापासून म्हणजेच 28 ते 30 मार्च या कालावधीत तीन दिवसीय बालमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात खो-खो, कबड्डी, धावणे अशा मैदानी खेळांच्या स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत. एकीकडे सोलापूरमध्ये तापमानाने चाळिशी गाठली असून सूर्यनारायण आग ओकत असल्याने दुपारी घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. अशातच हिवाळ्याऐवजी या मैदानी स्पर्धा रखरखत्या उन्हात भरवण्यात आल्याने पालकांकडून संताप व्यक्त होत आहे. उन्हामुळे मुलांना उष्माघाताचा त्रास झाल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.
सोलापूर-पुणे महामार्गावरील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठासमोरील सिंहगड इन्स्टिटय़ूटच्या मैदानावर पहिलावहिला चाचा नेहरू बालमहोत्सव पार पडणार आहे. महिला व बालविकास विभाग आणि सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित सिंहगड इन्स्टिटय़ूट (केगाव) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवात 36 जिह्यांतील 900 स्पर्धक सहभागी होणार आहेत. महोत्सवाअंतर्गत कबड्डी, खो-खो, लांब उडी अशा मैदानी खेळासह चित्रकला, निबंध, वत्तृत्व, हस्ताक्षर, समूह नृत्य अशा स्पर्धा होणार आहेत. बहुतेक शाळांमध्ये हिवाळ्यात म्हणजेच नोव्हेंबर – डिसेंबर महिन्यात मैदानी स्पर्धा घेतल्या जातात. परंतु बालमहोत्सवाअंतर्गत रखरखत्या उन्हात मैदानी खेळांचे आयोजन केल्यामुळे महिला व बालविकास विभागाला मुलांच्या आरोग्याची काळजी आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Comments are closed.