गुजरातमध्ये क्रेन कोसळून इंजिनीअरसह तिघांचा मृत्यू

वृत्तसंस्था/ द्वारका

देवभूमी द्वारका येथील ओखा प्रवासी जेटीजवळ बुधवारी मोठी दुर्घटना घडली. येथे क्रेन कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला आहे. नवीन घाटाचे बांधकाम सुरू असताना हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच जीएमबी कोस्ट गार्ड, पोलीस आणि अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये अभियंता, पर्यवेक्षक आणि मजूर अशा तिघांचा समावेश आहे. या अपघातानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तपासाचे आदेश दिले असून ओखा सागरी पोलिसांनी सर्वांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात हलविले.

प्राथमिक माहितीनुसार, ओखा जेट्टी येथे तटरक्षक दलाच्या जेट्टीचे बांधकाम सुरू आहे. याचदरम्यान अचानक क्रेनचा काही भाग पडल्यामुळे तीन जणांचा समुद्रात पडून मृत्यू झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. अन्य एका मजुराला गंभीर अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याला मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. घटनेची माहिती मिळताच तटरक्षक दल, पोलीस विभाग, अग्निशमन दल आणि 108 ची टीम घटनास्थळी पोहोचली. आता या प्रकरणाचा अधिक तपास ओखा सागरी पोलीस करत आहेत.

गुजरात मेरीटाईम बोर्डाच्या देखरेखीखाली सुरू असलेल्या कोस्ट गार्ड जेटीवर काम करत असताना ही दुर्घटना घडली आहे.

Comments are closed.