पालघरमध्ये तीन मित्रांना मालगाडीने चिरडले, संशयास्पद मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रेल्वे ट्रॅक ओलांडताना तीन मित्रांना मालगाडीने चिरडल्याची हृदयद्रावक घटना पालघरमध्ये घडली आहे. हे तीनही युवक पालघर पूर्वेकडील विरेंद्रनगर परिसरात राहणारे होते. मात्र या मुलांचा मृत्यू संशयास्पद झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

स्वप्नील पालांडे (23), कुणाल दुबळा (23) व अफरोझ शेख (28) अशी मृतांची नावे असून ते पालघर पूर्वेतील विरेंद्रनगर भागात राहत होते. शुक्रवारी संध्याकाळी पालघर रेल्वे स्टेशननजीक असलेल्या जैन मंदिर परिसरात रेल्वे रुळ ओलांडत असताना मालगाडीने या तीनही मित्रांना उडवले. दरम्यान, या घटनेनंतर मृतांच्या नातेवाईकांनी आपल्या मुलांचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे. साध्या वेशातील पोलीस मुलांचा पाठलाग करीत होते. त्यांना मारहाणदेखील केली आहे. या पोलिसांच्या तावडीतून सुटून पळ काढत असतानाच त्यांना मालगाडीने चिरडल्याचे या मुलांच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले आहे. मात्र असा प्रकार घडला नसून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याबाबत चौकशी सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

पाठलाग करणारे नेमके कोण होते? चौकशी करा !

पालकांच्या नातेवाईकांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. मृताचे नातेवाईक असलेल्या दर्शना सिंग यांनी मृत तरुणाचा पाठलाग करणारे नेमके कोण साध्या वेशातील पोलीस होते, असा सवाल केला असून या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी तपास करणे गरजेचे आहे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Comments are closed.