उत्तर प्रदेशात तीन खलिस्तानी मारले गेले
पंजाबमधील पोलीस स्थानक हल्ल्याचे होते सूत्रधार
वृत्तसंस्था / पिलिभीत
उत्तर प्रदेशातील पिलिभीत येथे 3 खलिस्तानवादी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. या दहशतवाद्यांनी पंजाबमधील एक पोलिस स्थानकारवर हल्ला करुन ते जाळले होते. हल्ल्याची ही घटना पंजाबमधील गुरुदासपूर येथे घडली होती. गुरविंदरसिंग, वीरेंदरसिंग ऊर्फ रवी आणि जसप्रीतसिंग ऊर्फ प्रताप सिंग अशी या तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा हस्तगर करण्यात आला आहे. या शस्त्रसाठ्यात दोन एके 47 रायफलींचाही समावेश आहे. या चकमकीत पंजाब पोलिसांचेही महत्वाचे योगदान असल्याची माहिती देण्यात आली.
पंजाबमधील पोलीस स्थानकावर हल्ला केल्यानंतर या तीघांनी तेथील शस्त्रांची लूटही केली होती. त्यानंतर त्यांनी पलायन केले होते. ते उत्तर प्रदेशात गेल्याची माहिती पंजाब पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेश प्रशासनाला ही माहिती कळविली. त्यामुळे उत्तर प्रदेश पोलीस सतर्क झाले. तीन्ही दहशतवादी पिलिभीत शहरात दडल्याची माहिती गुप्तचरांकडून मिळाल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी ते लपलेल्या परिसराची नाकेबंदी करुन त्यांना शोधण्याचा प्रयत्न चालविला होता. तथापि, दहशतवाद्यांनी प्रथम पोलिसांवर गोळीबर केला. त्यानंतर साधारणत: अर्धा तास जोरदार चकमक उडली. अखेर या तीघांनाही ठार करण्यात पोलिसांना यश मिळाले. या चकमकीत दोन पोलीस जखमी झाले आहेत.
पोलीस प्रमुखांकडून माहिती
या चकमकीची सविस्तर माहिती पिलिभीतचे पोलीस आधिक्षक अविनाश पांडे यांनी दिली आहे. दहशतवादी लपलेल्या स्थानाला पोलीसांनी चारी बाजूंनी वेढले होते. प्रथम दहशतवाद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांची कोंडी केली. या कोंडीतून सुटण्यासाठी दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. नंतर पोलिसांच्या गोळीबारात तिघेही ठार झाले. त्यांची ओळख पटविल्यानंतर नावे घोषित करण्यात आली, अशी माहिती त्यांनी दिली. या चकमकीत उत्तर प्रदेश पोलिसांप्रमाणेच पंजाब पोलिसांचाही सहभाग होता. दोन्ही राज्यांच्या पोलिस तुकड्यांचे हे संयुक्त अभियान होते, असेही स्पष्ट केले गेले.
खलिस्तानवाद ठेचणार
अलिकडच्या काळात खलिस्तानवाद्यांनी पंजाब आणि अन्य राज्यांमध्ये पुन्हा डोके वर काढल्याचे दिसून येत आहे. मात्र, खलिस्तानवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पंजाब आणि शेजारच्या राज्यांमधील पोलिसांनी संयुक्तरित्या प्रयत्न चालविले असून खलिस्तानवादाला ठेचण्याचा निर्धार करण्यात आला आहे.
खलिस्तान झिंदाबाद फोर्स
ठार झालेले तीनही दहशतवादी खलिस्तान झिंदाबाद फोर्सचे हस्तक आहेत, असे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. ही संघटना गेली जवळपास चाळीस वर्षे पंजाबमध्ये कार्यरत आहे. या संघटनेला पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संघटनेकडून अर्थसाहाय्य आणि शस्त्र, तसेच प्रशिक्षण मिळाले आहे. या संघटनेवर बऱ्याच वर्षांपासून बंदी घालण्यात आली आहे. तरीही ती काही प्रमाणात आजही कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली. चकमकीच्या घटनेनंतर आता या संघटनेची पाळेमुळे खणून काढण्यासाठी अभियानाचा प्रारंभ करण्यात आला आहे.
मोठा शस्त्रसाठा हस्तगत
या तीन दहशतवाद्यांचा एन्काऊंटर झाल्यानंतर त्यांच्या लपण्याच्या जागेतून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या साठ्यात दोन एके 47 रायफली, काही हातबाँब, रोख रक्कम, रायफलच्या गोळ्या आणि इतर स्फोटके हस्तगत करण्यात आली आहेत. उत्तर प्रदेशात मोठा हिंसाचार घडविण्याचा त्यांचा कट होता असा संशय आहे. त्यामुळे चकमकीच्या परिसरात पोलिसांची संख्या वाढविण्यात आली.
Comments are closed.