तामिळनाडूत चक्रीवादळात तिघांचा मृत्यू

149 जनावरे मृत्युमुखी, 234 घरांना फटका : 57,000 हेक्टर शेतजमीन पाण्याखाली

वृत्तसंस्था/ हैदराबाद, चेन्नई

देशाच्या पूर्व किनारपट्टीला चक्रीवादळ ‘दितवाह’चा तडाखा बसण्यास सुरुवात झाली आहे. हा प्रभाव आणखी दोन दिवस जाणवणार असून पावसाशी संबंधित घटनांमध्ये तामिळनाडूमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. रविवारी तुतीकोरिन आणि तंजावरमध्ये भिंत कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. तर मयिलादुथुराईमध्ये वीज पडून एका 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

तामिळनाडूसह आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरीला चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता असून किनारपट्टीवरील लोकांना सतर्क करण्यात आले आहे. श्रीलंकेत झालेल्या कहरानंतर चक्रीवादळ दितवाह रविवारी संध्याकाळी तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनाऱ्यावर धडकले. तामिळनाडूमध्ये किनारी भागात 234 झोपड्या/मातीच्या घरांचे नुकसान झाले आहे. याव्यतिरिक्त 149 जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. तसेच सुमारे 57,000 हेक्टर शेती जमीन पाण्याखाली गेल्याची माहिती प्रशासकीय पातळीवरून देण्यात आली.

हवामान खात्याने कु•ालोर, नागापट्टिनम, मयिलादुथुराई, विल्लुपुरम आणि चेंगलपट्टूसह अनेक भागात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफसह 28 हून अधिक आपत्ती प्रतिसाद पथके तैनात करण्यात आली आहेत. याशिवाय, महाराष्ट्र आणि गुजरातमधील एनडीआरएफ तळांवरून 10 पथके चेन्नईत दाखल झाली आहेत. तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसामुळे शनिवारपासूनच अनेक विमानो•ाणे रद्द करण्यात आली. दुसरीकडे, पुद्दुचेरी सेंट्रल युनिव्हर्सिटीने विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करतानाच सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

रेड अलर्ट जारी

चक्रीवादळाच्या प्रभावामुळे तामिळनाडूच्या अनेक किनारी जिह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे आधीच सुरू झाले आहेत. पुद्दुचेरीमध्ये जोरदार वारे आणि भरती-ओहोटीमुळे एक पूल कोसळला आहे. किनारी भागात पाऊस सुरूच आहे. तामिळनाडूचे रामनाथपुरम आणि नागापट्टिनम जिल्हे सर्वात जास्त प्रभावित झाल्याचे वृत्त आहे. वादळाच्या प्रभावामुळे भारतात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तामिळनाडूच्या चार जिह्यांमध्ये रेड अलर्ट आणि पाच जिह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. हवामान खात्यानुसार, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी ही सर्वाधिक प्रभावित राज्ये असण्याची शक्यता आहे.

तामिळनाडूत एनडीआरएफच्या चौदा तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पुणे आणि वडोदरा येथून चेन्नईला आणखी दहा पथके पाठवण्यात आली आहेत. रामेश्वरम-चेन्नई सेक्टरवरील अकरा रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. इंडिगो एअरलाईन्सने जाफना, तुतीकोरिन आणि तिरुचिरापल्लीला जाणारी आणि येणारी विमाने रद्द केली आहेत. चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी पुद्दुचेरीमध्ये एनडीआरएफची दोन पथके तैनात करण्यात आली आहेत. पुद्दुचेरी, कराईकल, माहे आणि यानममधील सर्व शाळा आणि महाविद्यालये सोमवारपर्यंत बंद राहतील. आंध्र प्रदेशमध्ये या चक्रीवादळादरम्यान 3 डिसेंबरपर्यंत काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Comments are closed.