हैदराबादमधील एकाच कुटुंबातील तिघांचा अमेरिकेत रस्ते अपघातात मृत्यू, दोन गंभीर जखमी
अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे दोन वाहनांच्या धडकेत हैदराबादमधील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. अपघातात अन्य दोघे जखमी झाले आहेत. अपघातात पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला असून, पती आणि धाकटी मुलगी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, हैदराबादमधील सैदाबाद येथील रहिवासी असलेले नवीद हे 10 वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थायिक झाले होते. हिंदुस्थानी वेळेनुसार, सोमवारी रात्री नवीद हे आपल्या कुटुंबासोबत प्रवास करत होते. यादरम्यान त्यांच्या वाहनाची दुसऱ्या वाहनाशी धडक झाली. या अपघातात नवीद यांची पत्नी नाझियासह मुलगा आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. नवीद आणि आणि धाकटी मुलगी गंभीर जखमी झाले आहेत.
मुलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना तिथल्या पोलिसांकडून अपघाताची माहिती मिळाल्याचे नवीद यांचे वडील शेख अब्दुल सईद यांनी सांगितले. कुटुंबीयांना अमेरिकेला जाण्यासाठी तातडीने व्हिसा उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती त्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे केली आहे.
Comments are closed.