मुलुंड स्थानकात एसी लोकल बंद, कोंडमारा… तीन प्रवासी बेशुद्ध; ऐन गर्दीच्या वेळी मोठी गडबड
ऐन गर्दीच्या वेळी मुलुंड स्थानकात एसी लोकल अचानक बंद पडल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. तब्बल 15 मिनिटे लोकल प्लॅटफॉर्मवरच थांबून राहिल्याने आणि एसी बंद पडल्याने प्रवाशांचा कोंडमारा झाला. या घटनेत तीन प्रवासी बेशुद्ध पडले. या संपूर्ण प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सकाळी 8.33 वाजता ही एसी लोकल टिटवाळा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने रवाना झाली. लोकल सकाळी साडेनऊच्या सुमारास मुलुंड रेल्वे स्थानकावर दाखल झाली. मात्र, लोकलमधील एक एसी युनिट अचानक बंद पडले आणि गाडी तिथेच थांबली. प्रचंड गर्दी त्यात लोकलचे दरवाजे आणि खिडक्या बंद असल्यामुळे प्रवाशांचा घामटा निघाला. तीन प्रवासी बेशुद्ध पडले. बेशुद्ध पडलेल्या प्रवाशांपैकी सुगंधा सिंग आणि राधिका गोटूवलेकर या महिला प्रवाशांना प्राथमिक मदतीनंतर घरी सोडण्यात आले तर फहीम अन्सारी यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले.
लोकल रद्द, प्रवाशांचे हाल
संबंधित एसी लोकल कुर्ला स्थानकात सेवेतून बाद करण्यात आली. लोकलमधील सर्व प्रवाशांना कुर्ला येथे उतरविण्यात आले. ही लोकल दुरुस्तीसाठी पाठविण्यात आली असून या लोकलच्या इतर दोन फेऱ्या देखील रद्द केल्या.
प्रवाशांची सुरक्षा ऐरणीवर
एसी लोकलमध्ये नेमका तांत्रिक बिघाड कशामुळे झाला याबाबत रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. मात्र, गर्दीच्या वेळेत एसी लोकल बंद पडल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
Comments are closed.