महाकुभ 2025 मध्ये तीन रेकॉर्ड सेट केले
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डतर्फे प्रमाणपत्र प्रदान : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गौरव
या नोंदींसाठी प्रमाणपत्रे प्राप्त…
- गंगा स्वच्छता विक्रम : वेगवेगळ्या 4 ठिकाणी 360 जणांनी केली स्वच्छता
- हस्तचित्र रंगवण्याचा विक्रम : 10,102 लोकांनी सामूहिकपणे चित्रे काढली
- झाडू मारण्याचा विक्रम : 19,000 लोकांचा एकाचवेळी स्वच्छतेत सहभाग
वृत्तसंस्था/लखनौ
प्रयागराज येथे मागील 45 दिवस चाललेल्या जगातील सर्वात मोठ्या धार्मिक आणि आध्यात्मिक मेळाव्याचा म्हणजेच महाकुंभाचा समारोप महाशिवरात्रीला झाला. या अभूतपूर्व 45 दिवसांच्या कार्यक्रमाची जगभरात चर्चा होत आहे. जगभरातील कोणीही यापूर्वी कधीही श्रद्धेचा इतका महासागर पाहिलेला नाही. 45 दिवसांत 66 कोटी 30 लाखांहून अधिक भाविकांनी संगमात स्नान केले. दररोज 1.25 कोटींहून अधिक भाविक महाकुंभात पोहोचले. तसेच 50 लाखांहून अधिक परदेशी भाविक आले. 70 हून अधिक देशांतील लोक प्रयागराजला पोहोचले. अमेरिकेच्या लोकसंख्येच्या दुप्पट आणि जगभरातील 100 हून अधिक देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त लोक प्रयागराजला पोहोचल्यामुळे संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले आहे.
महाकुंभमेळा हा सरकारी कार्यक्रम नव्हता, तर तो सनातन परंपरेचा आणि भारताच्या सांस्कृतिक शक्तीचा मेळा होता. या ठिकाणी सुरक्षेसाठी 37 हजारांहून अधिक पोलीस तैनात होते. तसेच 14 हजारांहून अधिक होमगार्ड होते. त्याव्यतिरिक्त सीआरपीएफ जवानही तैनात करण्यात आले होते. एकूण 70 हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. महाकुंभाच्या समारोपाच्या निमित्ताने भाविकांनी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांचे कौतुक केले.
स्वच्छतेचा जागतिक विक्रम
महाकुंभात केवळ भाविकांच्या संख्येचा विक्रमच झाला नाही तर स्वच्छतेचा जागतिक विक्रमही झाला. महाकुंभ मेळा परिसरातील 4 झोनमध्ये एकाचवेळी स्वच्छता आणि झाडू मारून 19 हजार स्वच्छता कर्मचाऱ्यांनी एक नवा आदर्श घालून दिला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या या उपक्रमाची जागतिक विक्रमात नोंद करण्यासाठी गिनीज बुक टीम देखील उपस्थित होती. 2019 च्या कुंभमेळ्यात 10,000 स्वच्छता कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे झाडू मारून विक्रम रचला होता. पण यंदा ही संख्या 19,000 झाल्यामुळे मोठ्या विक्रमाची नोंद झाली.
हँड पेन्टिंगचा विक्रम
अन्य एक जागतिक विक्रम हाताने रंगवण्याचा होता. प्रयागराजमध्ये 10,102 लोकांनी एकाचवेळी चित्र काढले. हे चित्र लोकांनी मिळून बनवले होते. हे चित्र काढणे म्हणजे लोकांचा सामुदायिक प्रयत्न होता. यामध्ये लोकांनी आपले कौशल्य दाखवले. यापूर्वी हा विक्रम 7,660 लोकांचा होता.
राष्ट्रपती, पंतप्रधानांसह अतिमहनीय व्यक्तींचा सहभाग
महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीमुळे तिची प्रतिमा थोडीशी मलिन झाली. परंतु या घटनेचा भाविकांच्या श्रद्धेवर फारसा परिणाम झाला नाही. लोकांचे आगमन अव्याहतपणे सुरू राहिले. चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, चित्रपट तारे आणि क्रीडा आणि उद्योग जगतातील व्यक्तिमत्त्वांपर्यंत, सर्वांनी महाकुंभमेळ्यातील संगमात स्नान केले. यादरम्यान त्यांनी राज्य सरकारने केलेल्या व्यवस्थेचे कौतुक केले.
मुख्यमंत्र्यांची 10 वेळा महाकुंभनगरीला भेट
महाकुंभाच्या आयोजनाबाबत राज्य सरकार सुरुवातीपासूनच गंभीर होते आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 45 दिवसांत 10 वेळा महाकुंभनगरीला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली. याशिवाय, त्यांनी लखनौ आणि गोरखपूर येथील नियंत्रण कक्षांमधून संपूर्ण सोहळ्यावर बारकाईने लक्ष ठेवले. महाकुंभाच्या औपचारिक समारोपाची घोषणा करण्यासाठी मुख्यमंत्री गुरुवारीही येथे आले होते.
विशेष उल्लेखनीय नोंदी…
- 66.30 कोटींहून अधिक भाविकांकडून संगमस्नान
- अमेरिकेच्या लोकसंख्येपेक्षा दुप्पट लोकांचा सहभाग
- 193 देशांमधील लोकसंख्येपेक्षा जास्त लोक उपस्थित
- 4 हजार हेक्टरमध्ये महाकुंभमेळा क्षेत्राची व्यापकता
- 4 लाखांहून अधिक तंबू आणि 1.5 लाख शौचालये
- महाकुंभाला आलेल्या भाविकांपेक्षा फक्त भारत, चीनमध्ये जास्त लोकसंख्या
- मेळ्याचा परिसर जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमपेक्षा 166 पट मोठा
Comments are closed.