खारेपाटणमध्ये उलगडला बाराव्या शतकातील नौकायुद्धाचा थरार!

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण येथे तब्बल बाराव्या शतकातील सागरी युद्धाचा जिवंत पुरावा सापडल्याने कोकणच्या इतिहासाला नवे दालन खुलले आहे. कपिलेश्वर व कालभैरव मंदिर परिसरात आढळलेल्या एका वीरगळावर कोरलेले नौकायुद्धाचे दृश्य इतिहास संशोधकांचे लक्ष वेधून घेत आहे.

स्थानिक अभ्यासक मुरारी भालेकर आणि ऋषिकेश जाधव यांनी इतिहास संशोधक डॉ. अंजय धनावडे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या सखोल अभ्यासात या वीरगळावर दोन नौकांमधील संघर्ष, शस्त्रधारी योद्धे आणि समुद्रातील युद्धाचे जिवंत चित्रण स्पष्टपणे दिसून आले. या शिल्पामुळे खारेपाटण येथे प्राचीन काळी सागरी लढाया झाल्याचे ठोस संकेत मिळाले आहेत. वीरगळ, ताम्रपट आणि उपलब्ध ऐतिहासिक संदर्भ एकत्रितपणे पाहता खारेपाटणचे सागरी, व्यापारी आणि लष्करी महत्त्व अधोरेखित झाले आहे. या संशोधनामुळे कोकण किनारपट्टीवरील नौकानयन परंपरा, नौका बांधणी तंत्रज्ञान आणि सागरी संरक्षण व्यवस्थेच्या इतिहासाला नवे परिमाण मिळाले आहे. महामहोपाध्याय वा. वि. मिराशी यांनी दक्षिण शिलाहारकालीन ताम्रपटांचे वाचन करून ‘बलिपट्टन’ म्हणजेच आजचे खारेपाटण असल्याचे यापूर्वी स्पष्ट केले होते. त्यांनी खारेपाटण ही दक्षिण शिलाहारांची राजधानी होती असेही नमूद केले आहे. ताम्रपटांमध्ये बंदरात येणाऱ्या व्यापार्‍यांना करमाफीचा उल्लेख आढळतो. यावरून सुमारे हजार वर्षांपूर्वीपासून खारेपाटण हे सागरी व्यापाराचे प्रमुख केंद्र होते, तसेच विजयदुर्ग-खारेपाटण-चिंचवली बावडा या व्यापारी मार्गावरील महत्त्वाचे ठिकाण म्हणून विकसित झाले होते, हे स्पष्ट होते.

डॉ. धनावडे यांच्या मते, वीरगळावरील शिल्पशैलीवरून हे नौकायुद्ध बाराव्या शतकाच्या मध्यकाळात घडले असावे. परिसरातील सतीशिळा तुलनेने नंतरच्या काळातील असून या भागात विविध ऐतिहासिक टप्प्यांमध्ये घडामोडी झाल्याचे त्यातून सूचित होते. यापूर्वी वेंगुर्ला (सिंधुदुर्ग), उरण (रायगड) आणि बोरीवली-एकसर (मुंबई) येथेही नौकायुद्धाचे संदर्भ आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर खारेपाटणमधील हा शोध कोकणच्या सागरी इतिहासातील महत्त्वपूर्ण दुवा ठरत आहे. कोकण इतिहास परिषदेच्या वसई येथे नुकत्याच पार पडलेल्या 15 व्या राष्ट्रीय वार्षिक अधिवेशनात प्रकाशित ‘कोकण इतिहास पत्रिका’ (जानेवारी 2026, अंक 1) मध्ये या संशोधनाचा सविस्तर लेख प्रसिद्ध झाला आहे. दरम्यान, खारेपाटणमधील या दुर्लक्षित ऐतिहासिक ठेव्याचे शास्त्रीय जतन व संवर्धन व्हावे, तसेच भविष्यात हे ठिकाण महत्त्वाचे ऐतिहासिक आणि पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावे, अशी अपेक्षा डॉ. धनावडे यांनी व्यक्त केली आहे. खारेपाटणच्या भूमीत दडलेला हा सागरी इतिहास आता नव्या तेजाने उजळून निघत आहे.

Comments are closed.