TikTok, AliExpress वेबसाईट अनब्लॉक? ॲपवरील बंदीबाबत महत्त्वाची अपडेट समोर

नवी दिल्ली :चीनचा व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म TikTok ची वेबसाईट भारतात पाच वर्षानंतर पुन्हा सुरु झाली आहे. मात्र, अजून ॲप सुरु झालेलं नाही. भारत सरकारनं 2020 मध्ये सुरक्षेचं कारण देत TikTok सह चीनच्या अनेक ॲपवर बंदी घातली होती. टीकटॉकसह चीनमधील शॉपिंग वेबसाईट AliExpressवरील बंदी हटवली गेली का अशी चर्चा सुरु आहे, ही वेबसाईट देखील सुरु होत आहे. मात्र, सीएनबीसी-टीव्ही 18 नं दिलेल्या वृत्तानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केंद्र सरकारनं या वेबसाईट संदर्भातील भूमिका बदलली नसल्याचं म्हटलं.

भारत सरकारनं अद्याप टिकटॉक आणि अली एक्स्प्रेस अनलब्लॉक करण्यासंदर्भात कोणत्याही सूचना दिलेल्या नसल्याचं म्हटलं. टिकटॉकडून बंदी उठवण्यासंदर्भात कोणताही अर्ज आला नसल्याचं देखील ते म्हणाले. 2020 मध्ये देण्यात आलेल्या बंदीच्या सूचना या अंतरिम नव्हत्या किंवा त्यामध्ये कोणता कालावधी दिलेला नव्हता. जोपर्यंत केंद्र सरकारची भूमिका बदलत नाही तोपर्यंत बंदी कायम असेल. टिकटॉकच्या वेबसाईटचं फक्त होमपेज ओपन होतं. मात्र, अजूनही टिकटॉक भारतात सुरु झालेलं नाही.

बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार काही यूजर्सकडे फक्त टिकटॉकचं होमपेज ओपन होत आहे. मात्र, गुगल प्ले ॲप स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवर टिकटॉक दिसत नाही. याशिवाय टिकटॉक किंवा बाईटडान्सनं भारतात ॲप पुन्हा सुरु होण्यासंदर्भातील अधिकृत भूमिका मांडलेली नाही.

जून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता. त्यानंतर भारत सरकारनं 59 ॲप्सवर राष्ट्रीय सुरक्षेचं कारण देत बंदी घातली होती. त्यामध्ये टिकटॉक, शेअर इट, यूसी ब्राऊजर, यूसी न्यूज यासह इतर लोकप्रिय ॲप्सचा समावेश होता. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 च्या कलम 69 अ नुसार बंदी घालण्यात आली होती.

टिकटॉकची वेबसाईट भारतात पुन्हा सुरु अशा वेळी होत आहे ज्यावेळी भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे विदेश मंत्री वांग यी यांची भेट नुकतीच झाली होती.  या भेटीत सीमेवर शांतता, सीमेवरुन व्यापार सुरु करणं, गुंतवणूक वाढवणं याबाबत चर्चा झाली. मात्र, भारत सरकारकडून टिकटॉक ॲपवरील बंदी हटवल्याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी चार दिवसांच्या चीन दौऱ्यावर जाणार आहेत. हा दौरा 29 ऑगस्ट पासून सुरु होईल. नरेंद्र मोदी 1 सप्टेंबरपर्यंत SCO परिषदेला उपस्थित राहतील.  गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांमधील संबंध सुधारत असल्याचं चित्र आहे.

आणखी वाचा

Comments are closed.