टीम इंडियाचं धोरण स्पष्ट! ‘कोण कुठे खेळतो यापेक्षा टीम काय मागते हे महत्त्वाचं’- तिलक वर्मा
IND vs SA: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना रविवारी धर्मशाला येथे रंगणार आहे. मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत असताना हा सामना निर्णायक ठरणार आहे. सामन्यापूर्वी भारतीय संघाचा युवा फलंदाज तिलक वर्माने पत्रकारांशी संवाद साधत संघाच्या रणनीतीबाबत महत्त्वाची भूमिका मांडली. फलंदाजी क्रमात असलेल्या लवचिकतेच्या धोरणाला तिलकने पूर्ण पाठिंबा दिला आहे.
आगामी टी-20 विश्वचषकाची तयारी लक्षात घेता भारतीय संघ मधल्या फळीत विविध प्रयोग करत असल्याचं तिलक वर्मानं स्पष्ट केलं. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये परिस्थितीनुसार जुळवून घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं, असं तो म्हणाला. सलामीवीर वगळता संघातील प्रत्येक फलंदाज कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीसाठी तयार असल्याचं त्याने सांगितलं. स्वतःबद्दल बोलताना तिलक म्हणाला की, तो तिसऱ्या ते सहाव्या क्रमांकापर्यंत कुठेही फलंदाजी करण्यास तयार आहे आणि संघ व्यवस्थापन जो निर्णय घेईल त्यामागे उभा राहील.
फलंदाजी क्रमातील काही बदल हे भूमिका आधारित नसून पूर्णतः सामन्याच्या परिस्थितीवर अवलंबून असतात, असं तिलक वर्मानं नमूद केलं. अक्षर पटेलने तिसऱ्या क्रमांकावर केलेली फलंदाजी याचं उत्तम उदाहरण असल्याचं त्याने सांगितलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असे प्रयोग यशस्वी ठरल्याचाही उल्लेख त्याने केला.
धर्मशालाच्या वातावरणाबाबत बोलताना तिलक म्हणाला की, थंडी असली तरी खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक वाटते. याच मैदानावर अंडर-19 क्रिकेट खेळल्याचा अनुभव आपल्याकडे असल्याचंही त्याने सांगितलं. सुरुवातीला कमी तापमानामुळे गोलंदाजांना थोडी मदत मिळू शकते, मात्र सामना हाय-स्कोरिंग होण्याची शक्यता त्याने व्यक्त केली.
दव, नाणेफेक आणि परिस्थिती यासाठी भारतीय संघ पूर्णतः सज्ज असल्याचं तिलक वर्मानं सांगितलं. ओल्या चेंडूने सराव केल्यामुळे कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्यास संघ मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तयार असल्याचा विश्वास त्याने व्यक्त केला. फलंदाजी क्रमातील बदलाचा तयारीवर परिणाम होत नसून, संघ आक्रमक शैलीतच खेळणार असल्याचं सांगत, ही टी-20 मालिका भारतच जिंकेल, असा ठाम विश्वास तिलक वर्मानं व्यक्त केला.
Comments are closed.